यूएनएफ जागतिक फेलोशिप: जगभरात सात जणांमधून नाशिकच्या मयुरी धुमाळची निवड

मयुरी धुमाळ www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जागतिक स्तरावर महत्त्वाच्या मानल्या जाणार्‍या ‘युनायटेड नेशन फाउंडेशन’च्या डेटा व्हॅल्यू अ‍ॅडव्होकेट फेलोशिपवर यंदा मराठी मुलीने नाव कोरले आहे. जगभरातून निवडलेल्या सात अभ्यासकांमध्ये भारतातून मयुरी धुमाळ हिची निवड झाली आहे. विशेष म्हणजे आशिया खंडातून ही एकमेव विद्यार्थिनी म्हणून प्रतिनिधित्व करणार आहे.

सामाजिक कार्यातून विकास साधण्याच्या ‘युनायटेड नेशन्स फाउंडेशन’च्या कार्यात माहिती संकलनाचा मोठा वाटा असतो. याचसाठी त्यांच्याकडून डेटा व्हॅल्यूज हा माहिती संकलन कार्याची फेलोशिप दिली जाते. यासाठी सामाजिक कार्यात सक्रिय असणारे जगभरातून केवळ 7 अभ्यासक निवडले जातात. यंदा जगभरातून 65 हून अधिक देशांमधून सुमारे 400 उमेदवारांनी अर्ज केले होते. त्यातून निवडलेल्या सात अभ्यासकांमध्ये मयुरीने बाजी मारली आहे. डेटा व्हॅल्यूज ही मोहीम तळागाळातील सामाजिक समस्यांचा अभ्यास करते. ही एक जागतिक चळवळ असून, त्यामध्ये 60 पेक्षा जास्त देशांतील शेकडो लोकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे अधिक न्याय्य आणि निर्भेळ माहितीचा साठा करण्याचे काम या अंतर्गत केले जाते. सप्टेंबर 2022 मध्ये युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीमध्ये सुरू करण्यात आलेली ही मोहीम अर्धदशलक्षाहून अधिक लोकांपर्यंत पोहोचली आहे. पुढील वर्षभरात, हे अभ्यासक डेटा व्हॅल्यू मोहिमेचे नेतृत्व करतील, आणि इतरांना, विशेषत: उपेक्षित समुदायातील लोकांना, माहिती संकलन कसं उपयुक्त आहे आणि त्याचा अयोग्य वापर कसा थांबवला पाहिजे हे पटवून देणार आहेत. साधारण वर्षभरासाठी ही फेलोशिप देण्यात आली आहे. मयुरी सध्या नाशिकमध्ये शोधिनी – Action Research या प्रोजेक्टवर काम करत असून हे काम करताना समाजातील अनेक घटकांची, समस्यांची अचूक माहिती आपल्याकडे असणे किती महत्त्वाचे आहे याचा ती स्वतः अनुभव घेत आहे. मयुरीच्या मते रिसर्च, अभ्यास ही ठराविक वर्गाची मक्तेदारी आहे असा एक समज असतो. पण त्यामुळे तळागाळातील लोकांचे प्रश्न, त्यांची मते, त्यांच्याकडचे ज्ञान दुर्लक्षित राहते. डेटा व्हॅल्यूज प्रोजेक्ट तळागाळातले ज्ञान, लोकसहभाग आणि डेटावर सामान्यांचा अधिकार यासाठी काम करते, हे समजल्यावर इंटरेस्ट वाटला आणि कुठेतरी जे म्हणायचे ते पोहोचवण्यासाठी ही संधी चालून आली आहे.

समाजातील उपेक्षित वर्गाच्या हाल अपेष्टा सक्षमपणे मांडण्याचे कौशल्य असल्याने प्रक्रियेत सहभागी होताना डेटा आणि सामाजिक प्रश्नांविषयीची मते मांडली, आज सरकारी रिपोर्ट आणि प्रत्यक्ष परिस्थिती यातली तफावत समजत असल्याने त्या माहितीचा योग्य वापर व्हावा म्हणून वाटणारी तळमळ पोहोचवली म्हणून निवड झाली आहे. जागतिक स्तरावर पोहचून असे काम करायला मिळणार आहे, जिथे खरी माहिती, लोकांची मते, सत्य परिस्थिती याला महत्त्व असणार आहे. – मयुरी धुमाळ.

हेही वाचा:

The post यूएनएफ जागतिक फेलोशिप: जगभरात सात जणांमधून नाशिकच्या मयुरी धुमाळची निवड appeared first on पुढारी.