रणसंग्राम ग्रामपंचायतींचा : नाशिक तालुक्यात भाजप, राष्ट्रवादीला कौल

सरपंच www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिक तालुक्यातील १६ ग्रामपंचायतींमध्ये थेट सरपंचपदाच्या लढतीत मतदारांनी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पारड्यात कौल टाकला असून, दोन्ही पक्षांचे प्रत्येकी चार सरपंच निवडून आले. शिवसेना व काँग्रेसच्या समसमान तीन उमेदवारांनी बाजी मारली आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्वराज्य संघटनेच्या रूपाली ठमके निवडून आल्या असून, एका ठिकाणी मतदारांनी अपक्षाच्या गळ्यात सरपंचपदाची माळ घातली आहे.

नाशिक तहसील कार्यालयात सोमवारी (दि. १९) झालेल्या मतमोजणीत दुपारी १२ पर्यंत सर्वच्या सर्व १६ ग्रामपंचायतींचे निकाल हाती आले. थेट सरपंचपदासाठी झालेल्या निवडणुकीत दहेगाव येथील शीतल बेंडकुळी या अधीच बिनविरोध निवडून आलेल्या होत्या. त्यामुळे उर्वरित १५ ग्रामपंचायतींमधील सरपंचपदासाठीच्या जागेसाठी प्रथम मोजणी करण्यात आली. अंतिम मतमाजेणीनंतर हाती आलेल्या निकालात भाजप व राष्ट्रवादीने चार-चार जागा पटकावत आपले वर्चस्व सिद्ध केले. शिवसेनेमधील अंतर्गत वादाचा फटका या पक्षाला बसला असून, तीन ठिकाणी त्यांचे थेट सरपंचपदाचे उमेदवार निवडून आले, तर काँग्रेसच्या वाट्याला तीन जागा आल्या आहेत. छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्वराज्य संघटनेने प्रथमच ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत नशीब आजमावले. त्यांच्या संघटनेच्या रूपाली ठमके यांनी गणेशगाव त्र्यंबक ग्रामपंचायतीत थेट सरपंचपदाला गवसणी घातली. यानिमित्ताने स्वराज्य संघटनेच्या राज्यातील पहिल्या सरपंच होण्याचा मान ठमके यांनी मिळविला आहे. एका जागेवर अपक्ष उमेदवार निवडून आला आहे. दरम्यान, राज्यातील सत्तानाट्यानंतर पहिल्यांदाच झालेल्या ग्रामपंचायतींमध्ये थेट सरपंचपदाच्या निवडणुका पार पडल्या. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची रंगीत तालीम म्हणून ग्रामपंचायतींकडे पाहिले जात असल्याने सर्वच राजकीय पक्ष ताकदीने या निवडणुकीला सामाेरे गेले होते. निकालानंतर काही ग्रामपंचायतींमध्ये थेट सरपंचपदी एका पक्षाला आणि सदस्य निवडीत दुसऱ्या पक्षाच्या उमेदवारांच्या पारड्यात मतदारांनी कौल दिल्याचे चित्र आहे. त्यामुळे निकालाचा कल बघता, डिसेंबर-जानेवारीत होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांना राजकीय रणनीतीत बदल करावा लागणार आहे.

पक्षनिहाय थेट सरपंच असे….

भाजप : 04

राष्ट्रवादी : 04

शिवसेना : 03

काँग्रेस : 03

अन्य : 01

थेट सरपंच झालेले उमेदवार (कंसात मते)

धोंडेगाव : प्रवीण बेंडकुळे (775), वाडगाव : वनिता निंबेकर (552), दुगाव : ज्ञानेश्वर गवे (477), राजूर बहुला : सीमा ससाणे (508), दहेगाव : शीतल बेंडकुळे (बिनविरोध), इंदिरानगर : चांगुणा बेंडकुळे (488), जातेगाव : सरला निंबेकर (884), गोवर्धन : गोविंद डंबाळे (1371), नाईकवाडे : भारताबाई बदादे (570), ओझरखेड : बाबूराव दिवे (849), नागलवाडी : रूपचंद पोटिंदे (257), गंगाव्हरे : लखन बेंडकुळे (452), सारूळ : मोहन डगळे (442) राजेवाडी : रेणुका तोकडे (256), गणेशगाव : रूपाली ठमके (449), वासाळी : आशा खेटरे (388)

हेही वाचा:

The post रणसंग्राम ग्रामपंचायतींचा : नाशिक तालुक्यात भाजप, राष्ट्रवादीला कौल appeared first on पुढारी.