रविवार विशेष : अर्भकाच्या बलिदानाची सामुदायिक शिकवण..

नवजात अर्भक www.pudhari.news

तात्पर्य : प्रताप म. जाधव

सटाणा ग्रामीण रुग्णालयाच्या दरवाजातच एका दुर्दैवी आदिवासी मातेला तिच्या नवजात अर्भकाचा मृत्यू पाहावा लागणे, ही गोष्ट कुणाकुणासाठी लज्जास्पद आहे, हे ठरवायचे झाले तर त्याची यादी फार मोेठी होईल. याची सर्वप्रथम जबाबदारी नि:संशय जिल्हा आरोग्य यंत्रणेवर आणि तिच्या वरिष्ठ प्रशासनावर येते. मात्र, वेगवेगळ्या स्तरावरील लोकप्रतिनिधी व छोट्या मोठ्या गोष्टींवरून हायतोबा करणार्‍या निद्रिस्त समाजाचा याला प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या हातभार लागला आहे, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.

पोटचा गोळा हातचा गेल्याने त्या महिलेने फोडलेला टाहो ऐकून राजकीय कार्यकर्त्यांनी संताप अनावर होत रुग्णालयाला टाळे ठोकणे ही तशी स्वाभाविकच प्रतिक्रिया म्हणावी लागेल. पण, रुग्णालयात आणीबाणीच्या प्रसंगी उपचारासाठी पुरेशी व्यवस्था नसल्याकडे सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी वेेळीच लक्ष दिले असते तर ही वेळ कदाचित आली नसती. ‘माझ्या काळात-आधीच्या काळात’ आणि ‘मी हे केले-त्यांनी ते केले नाही’, अशा स्वरूपाच्या खापरफोड्या खेळातच अडकून पडलेल्या नेतेमंडळींना अंकुश लावण्याचे काम खरे तर अखिल समाजाचे; पण आपल्या या ताकदीचाच त्याला विसर पडला आहे. एखादी घटना ऐकून वा बातमी वाचून थोडा वेळ हळहळणे एवढ्यापुरतीच आपली संवेदनशीलता शाबूत राहिली आहे. ती पुन्हा जागृत व्हायला कुणाचा तरी अकाली बळी जावा लागतो किंवा कुणाचे तरी स्मशानभूमीअभावी भरपावसात अंत्यसंस्कार व्हावे लागतात.. एखाद्या सरकारी रुग्णालयाला डॉक्टर मिळण्यासाठी एका बाळाला दुनिया पाहण्यापूर्वीच बलिदान करावे लागत असेल तर ते अतिशय संतापजनक, तसेच संवेदनशील मनाला अस्वस्थ करणारे आहे. खरे तर, सगळीकडे असंवेदनशीलताच भरून राहिलेली पाहायला मिळते. तिचा प्रत्यय त्या अडलेल्या मातेला सटाणा ग्रामीण रुग्णालयात आला. असह्य कळांनी रुग्णालयाच्या दारात आलेल्या त्या बिचारीला यंत्रणेचा निष्ठूरपणा तिच्या बाळाचा काळ बनून आजूबाजूला घोंंगावतो आहे, याची कल्पनाही आली नसावी. दरवाज्यातच प्रसूत झालेल्या त्या कमनशिबी आईचे पोर डोळे मिटत असताना तिच्या मनाची काय अवस्था झाली असेल, याची आपण कल्पनाही करू शकत नाही किंवा केवळ कल्पना करून शांत बसून राहतो. कारण, सुखवस्तू-सुस्थितीतील मध्यमवर्गीयांवर अशी वेळ येण्याची सुतराम शक्यता नसते. ती बहुधा येते, दुर्गम भागात जीवन कंठणार्‍या आदिवासींवर. त्यांच्या जगण्याला जीवन तरी कसे म्हणावे, अशी परिस्थिती आहे. त्यांना जन्मही सुलभ नाही अन् मृत्यूदेखील. मरणानंतरही सुटका होऊ नये, असे शापित जीवन त्यांच्या वाट्याला आले आहे. शेड नसलेल्या स्मशानभूमीतच त्यांच्या चिता जळतात. पावसाळ्यात वरून पाणी कोसळत असले, की झाडपाल्याचा निवारा करून मृतदेहांवर अंत्यसंस्कार करावे लागतात. जगताना धिंडवडे अन् मेल्यानंतरही.. सध्या आपण फॉक्सकॉन गेला अन् एअरबस येणार, यावर चर्चा करतो आहोत. औद्योगिक भरभराट व्हायलाच हवी. सर्वसामान्य माणसाची उपजीविका चालण्यासाठी त्याला रोजगार मिळणेही तेवढेच आवश्यक. मात्र, दुसरीकडे आपल्याच बांधवांना जन्माचा सोहळा आणि मरणानंतरचे विधी सुखद करून देण्याची जबाबदारीही आपली नाही का? सटाण्यात अकाली गेलेल्या त्या बाळाच्या मृत्यूतून आपण एवढे शिकलो तरी पुरेसे आहे.

हेही वाचा:

The post रविवार विशेष : अर्भकाच्या बलिदानाची सामुदायिक शिकवण.. appeared first on पुढारी.