रस्ता सुरक्षेतील कार्याबद्दल अभिनेते जॅकी श्रॉफ यांच्या हस्ते ‘नाशिक फर्स्ट’चा गौरव

नाशिक गौरव www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
रस्ता सुरक्षेतील उत्कृष्ट कार्याबद्दल नाशिक फर्स्ट संस्थेला राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मुंबईत पार पडलेल्या या सोहळ्याप्रसंगी अभिनेते जॅकी श्रॉफ यांच्या हस्ते संस्थेला पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच जिल्ह्यातील अधिकार्‍यांना गौरविण्यात आले.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय यांच्या पुढाकारातून राज्यात बुधवार (दि. 11) पासून सुरक्षित वाहतुकीचे महत्त्व या विषयावर जनजागृती अभियान हाती घेण्यात आले आहे. राज्याचे उत्पादन शुल्कमंत्री शंभुराजे देसाई यांच्या हस्ते या अभियानाचा प्रारंभ झाला. यानिमित्त रस्ते सुरक्षेबाबत कार्य करणार्‍या व्यक्ती व संस्थांना सन्मानित करण्यात आले. नाशिकमध्ये गेल्या 13 वर्षांपासून रस्ते सुरक्षेसंदर्भात कार्य करणार्‍या नाशिक फर्स्ट संस्थेला प्रशस्तिपत्रक प्रदान करण्यात आले. संस्थेचे संचालक सुरेश पटेल व व्यवस्थापक भीमाशंकर धुमाळ यांनी हा पुरस्कार स्वीकारला. नाशिकचे मोटार वाहन निरीक्षक समीर शिरोडकर, मालेगाव उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक सचिन बोधले, सहायक मोटार वाहन निरीक्षक जावेद शेख, सोमनाथ घोलप, राहुल महाजन, गायत्री चव्हाण, वाहनचालक विजय वटवाल आदींनाही यावेळी जीवनदूत पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सोहळ्याप्रसंगी अपर पोलिस महासंचालक (वाहतूक) कुलवंत सरंगल, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सहसंचालक संजय यादव, परिवहन उपआयुक्त भरत कळसकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचा:

The post रस्ता सुरक्षेतील कार्याबद्दल अभिनेते जॅकी श्रॉफ यांच्या हस्ते ‘नाशिक फर्स्ट’चा गौरव appeared first on पुढारी.