राज्यपालांची खंत, म्हणाले आजपर्यंतच्या राज्यपालांनी विशेषाधिकारांचा वापर केला नाही

राज्यपाल,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्र राज्याने प्रदान केलेल्या विशेषाधिकारांची प्रभावी अंमलबजावणी करत आदिवासी बांधवांसाठी पेसा, घरे, गावठाणातील जागांचे वितरण व वनपट्टे प्रदान करण्यात आले. विशेषाधिकारांचे विकेंद्रीकरण केल्याने स्थानिक स्तरावर आदिवासींच्या समस्यांचे निराकरण होऊ लागल्याचे कौतुकोद्गार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काढले. राज्यातील आजपर्यंतच्या राज्यपालांनी विशेषाधिकारांचा वापर केला नसल्याची खंतही व्यक्त करताना आदिवासींनी आपली संस्कृती विसरू नये, असे आवाहन कोश्यारी यांनी केलेे.

आदिवासी विकास विभागाने भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्ताने मंगळवारी (दि.15) आयोजित जनजातीय गौरव दिवस आणि आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले. गोल्फ क्लब मैदानावर आयोजित या सोहळ्याप्रसंगी राज्यपाल बोलत होते. व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार, आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित, पालकमंत्री दादा भुसे, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, खासदार हेमंत गोडसे, आदिवासी विभागाचे अपर मुख्य सचिव प्रदीप व्यास, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, आदिवासी विभागाचे आयुक्त हिरालाल सोनवणे, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त राजेंद्र भारूड, आदिवासी विकास विभागाच्या व्यवस्थापकीय संचालिका लीना बनसोड आदी उपस्थित होते.

राज्यपाल कोश्यारी पुढे म्हणाले की, देशातील तीन ते चार राज्यांनी राज्यपालांना विविध विशेषाधिकार प्रदान केले असून, त्यात महाराष्ट्र एक आहे. त्यामध्ये आदिवासी बांधवांच्या उन्नतीसाठीच्या योजनांचा समावेश आहे. मात्र, राज्यपालाची सूत्रे हाती घेण्यापूर्वी आदिवासींच्या योजनांसाठी विशेषाधिकारांचा वापर म्हणावा तसा झाला नाही. त्यामुळे आदिवासींनी योजनांपासून वंचित राहावे लागले. पण, राज्यपालपदी आपली नियुक्ती झाल्यानंतर सर्वप्रथम या विशेषाधिकारांचा वापर आपण सुरू करताना त्यांचे विकेंद्रीकरण केले. आदिवासींच्या योजनांमध्ये जिल्हाधिकार्‍यांनी एखाद्या लाभार्थ्यांचे प्रकरण नाकारल्यास विभागीय आयुक्तांकडे दाद मागण्याची संधी उपलब्ध झाली. त्यामुळे स्थानिक पातळीवरच तक्रारींचे निराकरण होतानाच आदिवासींचा राजभवनापर्यंतचा फेरा वाचला. योजनांमधील रक्कम डीबीटीद्वारे आदिवासींच्या बँकखात्यात जमा केली जात असल्याने पैशाचा इतरत्र उपयोग करणे बंद झाल्याचे कोश्यारी म्हणाले.

कार्यक्रमाप्रसंगी राज्यपालांच्या हस्ते लाभार्थ्यांना सातबारा व वनपट्ट्यांचे प्रातिनिधिक स्वरूपात वितरण करण्यात आले. तसेच विविध योजनांअतर्गत लाभार्थ्यांना आर्थिक मदतीचे धनादेशासह राष्ट्रीय व राज्यस्तरावर विविध क्रीडा स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केलेल्या खेळाडूंचा यावेळी सत्कार करण्यात आला. राज्यपालांच्या हस्ते आदी स्वयंपोर्टल व ग्रामसाथी कॉफी टेबलबुकचे अनावरण पार पडले. याप्रसंगी आमदार सर्वश्री सीमा हिरे, सुहास कांदे, दिलीप बोरसे, हिरामण खोसकर, जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांच्यासह विविध अधिकारी व मान्यवरांसह राज्यभरातून आलेले आदिवासी बांधव उपस्थित होते.

श्री हनुमान आदिवासींचे वंशज :

श्री हनुमान यांचे जन्मस्थान नाशिक की तेलंगणा यावरून गेल्या वर्षी वाद उभा ठाकला होता. हाच धागा पकडत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भगवान हनुमान यांची कीर्ती बघता ते आदिवासी व वनवासी बांधवांचे वंशज असल्याचे वक्तव्य केले. देशाच्या उभारणीत भगवान बिरसा मुंडा यांचे महत्त्व आणि स्थान वरचे आहे.

आदिवासींचा सन्मान :

देशवासीयांना आजपर्यंत महाभारतामधील द्रौपदी माहिती होती. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामधील केंद्र शासनाने आदिवासी समाजातील द्रौपदी मुर्मू यांना देशाच्या राष्ट्रपती म्हणून सर्वोच्चपदी विराजमान केले. नाशिकची लेक डॉ. भारती पवार यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान दिले. आदिवासी बांधवांसाठी ही सन्मानजनक बाब असल्याचे उद्गार राज्यपालांनी काढले.

ना. शिंदे समस्या सोडवतील :

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मविआ सरकारचे नेतृत्व करत असताना ना. नरहरी झिरवाळ 20 आदिवासी आमदारांना राजभवनावर घेऊन येत. ते आमच्या समस्यांचे निराकरण करण्याची मागणी करत असल्याची आठवण राज्यपालांनी सांगितली. तसेच व्यासपीठावरील झिरवाळ यांच्याकडे बघत आता तुम्हाला माझ्याकडे येण्याची आवश्यकता नाही. ज्या काही समस्या आहेत, त्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे विशद करा. ते नक्कीच तुम्हाला न्याय देतील, असा सल्ला कोश्यारी यांनी दिला.

हेही वाचा :

The post राज्यपालांची खंत, म्हणाले आजपर्यंतच्या राज्यपालांनी विशेषाधिकारांचा वापर केला नाही appeared first on पुढारी.