राज्यपालांच्या वक्तव्यावरून लक्ष हटविण्यासाठी राऊतांवर कारवाई : नाना पटोले

नाना पटोले www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्रातील जनतेबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. या वक्तव्यावरून सर्वसामान्यांचे लक्ष हटविण्यासाठीच शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्याविरोधात ईडीने कारवाई केली. ईडीच्या माध्यमातून विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. भाजपकडून दबावतंत्राचा वापर सुरू असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी केले.

शहरात रविवारी (दि.31) पार पडलेल्या काँग्रेसच्या मेळाव्यानंतर आमदार पटोले यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. भाजपकडून सातत्याने विरोधकांवर खोटे आरोप लावून त्यांची मुस्कटदाबी केली जात आहे. ईडीचा धाक दाखवून पक्षांतर घडवून आणले जात आहे. भाजपमध्ये गेल्यानंतर संबंधित नेत्यांविरोधात ईडी कारवाई होत नाही. भाजपमध्ये आल्यानंतर आरोप असलेल्या नेत्याचे शुध्दीकरण कसे होते ? असा सवाल पटोले यांनी उपस्थित केला.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळात हे ईडीचे सरकार असल्याचे जाहीर केले. महाराष्ट्रातील सत्ता बदलासाठी 40 आमदारांना प्रत्येकी 50 कोटी दिल्याची चर्चा आहे. या चर्चेत तथ्य असल्यास इतके पैसे कुठून आले ? आता मंत्रिमंडळ विस्तारलाही विलंब होत आहे. भाजप तसेच विशेषत: शिंदेगटातील सर्वच आमदारांना कॅबिनेट मंत्री होण्याची इच्छा आहे. त्यामुळेच मंत्रिमंडळ विस्तार वारंवार लांबणीवर पडत असल्याचा टोला पटोले यांनी लगावला.

राज्यात असंविधानिक सरकार : महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर सर्वांत मोठ्या पक्षाने सरकार बनविणे अपेक्षित होते. मात्र, एकमेव आमदार असलेले एकनाथ शिंदे यांनी सरकार स्थापन केले. हे सरकार असंविधानिक असून, न्यायालयाच्या निर्णयानंतर त्यावर शिक्कामोर्तब होईल. दोघांच्या सरकारमुळे ऐन ओल्या दुष्काळात राज्यातील प्रशासन ठप्प आहे. राज्यातील राजकिय अनियमिततेला केंद्र सरकार जबाबदार असल्याची टीका पटोले यांनी केली.

हेही वाचा :

The post राज्यपालांच्या वक्तव्यावरून लक्ष हटविण्यासाठी राऊतांवर कारवाई : नाना पटोले appeared first on पुढारी.