राज्यपाल, मुख्यमंत्री येती नाशिकला, तोची दिवाळी, दसरा

शिंदे, कोश्यारी www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मंगळवारी (दि. 15) नाशिकमध्ये येत आहेत. राज्याच्या दोन्ही प्रमुखांच्या दौर्‍यानिमित्त नाशिक महापालिकेने रविवारी (दि. 13) सुटीच्या दिवशीही शहरातील प्रमुख रस्त्यांचे डांबरीकरण करीत खड्डे बुजविले. त्यामुळे या दोन्ही नेत्यांच्या निमित्ताने का होईना, नाशिककरांचा प्रवास काही प्रमाणात सुखकर होणार आहे.

नाशिकमध्ये आदिवासी विभागाच्या राज्यस्तरीय महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यास राज्यपाल व मुख्यमंत्री यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या दोघांव्यतिरिक्त राज्यातील तीन ते चार प्रमुख मंत्रीही यानिमित्ताने नाशिकमध्ये येत आहेत. शहरातील विविध कार्यक्रमांना मुख्यमंत्री हजेरी लावण्याची शक्यता आहे. व्हीव्हीआयपींच्या दौर्‍यासाठी प्रशासकीय पातळीवर जोरदार हालचाली सुरू आहेत. नाशिक महापालिकेनेदेखील तयारीवर भर दिला आहे. व्हीव्हीआयपींच्या दौर्‍याआधी शहरातील प्रमुख रस्त्यांचे डांबरीकरण करून खड्डे बुजविण्यात येत आहेत. त्यासाठी बांधकाम विभाग झाडून कामाला लागला आहे.

नाशिक : महापालिकेच्या वतीने सुटीच्या दिवशीही राजीव गांधी मुख्यालय परिसरासह शहराच्या विविध भागात युद्धपातळीवर सुरु असलेले रस्त्यांचे डांबरीकरण. (सर्व छायाचित्रे : रुद्र फोटो)

यंदाच्या पावसाळ्यात शहरातील रस्त्यांची दैना झाली होती. शहरातील एकही रस्ता असा नव्हता, जेथे सर्वसामान्य नाशिककर सुलभपणे प्रवास करेल. पावसाळा संपून तीन आठवड्यांचा कालावधी लोटला असतानाही, रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम संथगतीने सुरू होते. दरम्यान, आदिवासी महोत्सवानिमित्त राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यासह प्रमुख मंत्र्यांची मांदियाळी नाशिकमध्ये मंगळवारी (दि. 15) असणार आहे. त्यामुळे उशिरा का होईना, नाशिक महापालिकेला जाग आल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

मुख्यमंत्र्यांच्या घोषणेकडे लक्ष
मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर एकनाथ शिंदे हे चौथ्यांदा नाशिकच्या दौर्‍यावर येत आहेत. यापूर्वीच्या तिन्ही दौर्‍यावेळी नाशिकसाठी कोणतीही मोठी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली नव्हती. त्यामुळे किमान या दौर्‍यात तरी रखडलेले निओ मेट्रो, नमामि गोदेसह नाशिक-पुणे रेल्वेबाबत मुख्यमंत्री काही घोषणा करणार का? याकडे सर्व नाशिककरांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा :

The post राज्यपाल, मुख्यमंत्री येती नाशिकला, तोची दिवाळी, दसरा appeared first on पुढारी.