राज्यातील आदिवासी संशोधक विद्यार्थ्यांचे साखळी उपोषण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

राज्यातील शेकडो आदिवासी संशोधक विद्यार्थी पीएच.डी. संशोधन अधिछात्रवृत्ती अर्थात फेलोशिपपासून वंचित असल्याने त्यांचे पीएच.डी. मिळविण्याचे स्वप्न अधुरे आहे. फेलोशिप योजनेची जाहिरात प्रसिध्द करण्यासाठी आदिवासी संशोधक विद्यार्थी कृती समितीने १५ डिसेंबरची डेडलाइन दिली. मात्र, शासनाकडून जाहिरात प्रसिध्द न झाल्याने समितीच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर धडकले असून, त्यांनी साखळी उपोषण सुरू केले आहे.

महाराष्ट्रातील विविध नामांकित विद्यापीठात दुर्गम-अतिदुर्गम भागातील आदिवासी समाजातील विद्यार्थी पीएच.डी.चे शिक्षण घेत आहेत. मात्र, हे शिक्षण घेण्यासाठी येणारा खर्च पूर्ण करण्याची संबंधित विद्यार्थ्यांसह त्यांच्या कुटुंबाची आर्थिक क्षमता नाही. राज्य शासनाकडून फेलोशिप मिळत नसल्याने विद्यार्थ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. बार्टी, सारथी आणि महाज्योती यांच्या धर्तीवर आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात टीआरटीआयने आदिवासी पीएच.डी. संशोधकांना फेलोशिप योजना सुरू करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली.

साखळी उपोषणात समितीचे कोषाध्यक्ष गजानन डुकरे, सीमा धाडसे, दामू वसावे, मारुती भिसे, सुनील पवार आदी सहभागी झाले होते.

प्रमुख मागण्या

अनुसूचित जमातीच्या पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती तत्काळ लागू करावी, राज्यातील सर्व कृषी व अकृषी विद्यापीठामध्ये अनुसूचित जमातीच्या राखीव जागेवर पीएच.डी. प्रवेशासाठी जातवैधता प्रमाणपत्र अनिवार्य करावे, ६ जुलै २०१७ च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ज्यांची जातवैधता प्रमाणपत्र अवैध झाले आहेत. त्यांना सेवेतून कमी करून मूळ आदिवासींना सेवेमध्ये सामावून घ्यावे.

हेही वाचा :

The post राज्यातील आदिवासी संशोधक विद्यार्थ्यांचे साखळी उपोषण appeared first on पुढारी.