राज्यातील शाळांच्या अनुदानात वाढ ; नाशिकमधील ‘किती’ शिक्षकांना होणार लाभ?

शाळांच्या अनुदानात वाढ,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

राज्यातील खासगी विनाअनुदानित प्राथमिक, माध्यमिक शाळांच्या अनुदानात वाढ करण्याचा निर्णय शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी घेतल्यानंतर त्याचा लाभ नाशिक जिल्ह्यातील एक हजार 101 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना मिळणार आहे.

माध्यमिक शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांना 20 टक्के, 40 टक्के अनुदानाच्या आधारे मासिक वेतन दिले जाते. या वेतनात वाढ करण्यासाठी शिक्षणमंत्री केसरकर यांनी वाढीव अनुदानाची घोषणा गेल्या महिन्यात केली. त्याआधारे नाशिक जिल्ह्यात 20 टक्के अनुदानासाठी 888 शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी पात्र ठरणार आहेत, तर 40 टक्के अनुदानासाठी 213 कर्मचारी पात्र ठरतात. त्यानंतर या कर्मचार्‍यांना 100 टक्के अनुदानावर नियुक्ती दिली जाते. त्यामुळे वर्षानुवर्षे अनुदानाची वाट बघणार्‍या शिक्षकांना याचा फायदा होणार आहे.

  • राज्य सरकारकडून 1,160 कोटींची तरतूद

राज्यातील 63 हजार शिक्षकांना या निर्णयाचा लाभ मिळणार असून, राज्य सरकारने त्यासाठी 1,160 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. दरवर्षी वाढीव 20 टक्के अनुदान मिळण्याची शिक्षकांना अपेक्षा असते. परंतु, राज्य शासनाकडून वेळेवर त्याची पूर्तता होत नाही.

The post राज्यातील शाळांच्या अनुदानात वाढ ; नाशिकमधील 'किती' शिक्षकांना होणार लाभ? appeared first on पुढारी.