राज्यात नाशिकचे निफाड सर्वांधिक थंड

थंडी,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

उत्तर भारतामधील बर्फवृष्टीचा परिणाम जिल्ह्याच्या हवामानावर झाला आहे. निफाडमध्ये शुक्रवारी (दि. १८) पारा ८.५ अंशांपर्यंत खाली घसरल्याने थंडीचा कडाका वाढला आहे. यंदाच्या हंगामातील हे सर्वांत नीचांकी तापमान ठरले असून, त्यामुळे निफाडवासीयांना हुडहुडी भरली आहे. नाशिक शहरातही किमान तापमानाच्या पाऱ्यात तब्बल दोन अंशांची घट झाल्याने गारठ्यात वाढ झाली.

तीन दिवसांपासून हिमालयीन भागात बर्फवृष्टी होत आहे. दक्षिणेकडील काही राज्यांमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज आहे. वातावरणातील या बदलाचा परिणाम महाराष्ट्रातील हवामानावर झाला आहे. उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींमुळे गेल्या २४ तासांमध्ये जिल्ह्यातील पाऱ्यात लक्षणीय घट झाली. निफाडला पाऱ्यात तब्बल ३ अंशांची घसरण होऊन पारा थेट साडेआठ अंशांपर्यंत खाली आहे. त्यामुळे तालुक्यात थंडीच्या कडाक्यात अचानकपणे वाढ झाली असून, तालुकावासीय गारठले आहे.

नाशिक शहराच्या तापमानातही बदल झाला आहे. १३.९ अंशांवरून पारा ११.२ अंशांपर्यंत खालावला आहे. परिणामी वातावरणातील गारठा वाढला आहे. रात्री व पहाटेच्या वेळी थंड वाऱ्यांचा वेग अधिक असल्याने सर्वसामान्यांना गुलाबी थंडीचा अनुभव येत आहे. शीतलहरींमुळे जिल्ह्याच्या अन्य भागांतही थंडीचा कडाका जाणवत आहे. त्याचा फटका ग्रामीण भागातील जनजीवनाला बसत आहे. पहाटेची शेतीची कामे थंडावली आहेत. थंडीपासून बचावासाठी उबदार कपडे व शेेकोट्यांचा आधार घेतला जातोय. दरम्यान, उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा वेग आणि दक्षिण भारतामधील पावसाळी वातावरण यामुळे पुढील तीन ते चार दिवस जिल्ह्यात थंडीचा जोर अधिक वाढले, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.

द्राक्षांना शेकोट्यांचा आधार

हवामानातील या बदलाचा फटका द्राक्षबागांना बसण्याची शक्यता आहे. विशेष करून पहाटेच्या वेळी पडणारे दवबिंदू आणि गारठा यामुळे द्राक्षमणी तडकण्याची तसेच फळात साखर उतरण्याच्या प्रक्रियेला बाधा पोहोचू शकते. त्यामुळे बागा वाचविण्यासाठी शेतकरी पहाटे बागांमध्ये शेकोट्या पेटवून धूरफवारणी करत आहेत.

हेही वाचा :

The post राज्यात नाशिकचे निफाड सर्वांधिक थंड appeared first on पुढारी.