राज्य परिवहन महामंडळ : स्क्रॅप बसेसमधून कसा होणार सुरक्षित प्रवास?

st www.pudhari.news

नाशिक (मालेगाव मध्य) : सादिक शेख
महिन्याच्या प्रारंभी 8 ऑक्टोबर हा दिवस अपघात वार ठरला. एकाच दिवसात महामंडळाची बस, खासगी बस आणि गॅस सिलिंडरची वाहतूक करणार ट्रक जळून खाक झाला. खासगी बसमधील 13 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. या अपघात सत्राने प्रवासी सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला. त्यातून प्रभावी उपाययोजना राबविल्या जातील, अशी अपेक्षा असताना वास्तव मात्र चिंताजनक आहे. मालेगाव आगारात स्क्रॅप बसेसचा वापर होत असून, त्यातून ‘एसटीचा प्रवास सुखाचा प्रवास’ कसा होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मालेगाव आगारात एकूण 55 बसेस आहेत. त्याद्वारे दररोज 325 फेर्‍या पूर्ण केल्या जातात. त्यातील 19 बसेसचे आयुर्मान पूर्ण झाले असतानाही त्यांचा वापर सर्रासपणे सुरू आहे. खराब रस्त्यांमुळे आधीच एसटी खिळखिळी झाली आहे. त्यात आता महामंडळाच्या दुर्लक्षाची भर पडली आहे. प्रत्येक बसमध्ये अग्निरोधके व प्रथमोपचार साहित्य असणे गरजेचे आहे. परंतु, 55 पैकी काहीच बसेसमध्ये ही सोय आणि खबरदारी दिसून येते. तसेच प्रथमोपचार पेटी असली तरी त्या केवळ नावालाच आहेत. आपत्कालीन परिस्थितीत प्रवासी सुरक्षा देव भरोसेच आहे. अचानक आग लागल्यास ती तत्काळ आटोक्यात आणणारी अग्निरोधके बसमध्ये नसल्याने मोठा अनर्थ घडू शकतो. तसेच दुखापत झालेल्या प्रवाशांना प्रथमोपचारासाठी पुढील थांब्यापर्यंत प्रतीक्षा करण्याशिवाय पर्याय नाही. याबाबत मालेगाव आगारातील पाच बसेसची पाहणी केली असता फक्त तीन बसेसमध्येच अग्निरोधके आढळून आली. तर औषध, मलमपट्टीविना प्रथमोपचार बॉक्स पडून होतेे.

चालकही नाखूश…
राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसचे आयुर्मान नियमानुसार 13 वर्षे किंवा 13 लाख किलोमीटर प्रवास निश्चित आहे. मालेगाव आगारातील 19 बसेस या 12 वर्षांपूर्वीच्या आहेत. गेल्या तीन वर्षांत एकही नवीन बस या आगाराला मिळालेली नाही. मालेगाव आगारात यापूर्वी 110 बसेस होत्या; आता मात्र फक्त 55 बसेस आहेत. त्याही सुस्थितीत नसल्याचे खुद्द चालकच म्हणतात. या जुन्या व स्क्रॅप बसेसमुळे बसचालकांना कंबरदुखी, पाठदुखी अशा विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. 10 वर्षांच्या आतील फक्त 15 बसेस आहेत. या गाड्यांचा उपयोग परराज्यात अहमदाबाद, सुरत, उनई तसेच पुणे, अक्कलकोट, सोलापूर, पंढरपूर या लांब पल्ल्यासाठी वापर केला जातो.

स्क्रॅप धोरणाचा विसर…
नव्या गाड्यांचा पुरवठा होत नाही. काही बसच्या खिडक्यांच्या काचा तुटल्या आहेत. काही गाड्या गुळगुळीत टायरवर धावत आहेत. त्यामुळे पंक्चरचे प्रमाण वाढले आहे. तसेच अपघाताची शक्यता असते. तात्पुरती मलमपट्टी करून बसगाड्या धावत असल्यामुळे प्रवाशांची सुरक्षितताच धोक्यात आली आहे. इतर आगाराची बस जर मालेगाव आगारात नादुरुस्त झाली तर सदर बस दुरुस्तीसाठी स्पेअरपार्ट लवकर मिळत नाही. त्यामुळे प्रवाशांना दोन-तीन तास ताटकळत उभे रहावे लागते किंवा दुसर्‍या बसने पुढील प्रवास करावा लागतो. जुन्या झालेल्या व आयुष्यमान संपत चाललेल्या गाड्या स्क्रॅपमध्ये काढल्या जातात. महामंडळाकडून दरवर्षी स्क्रॅप धोरण निश्चित करून विभागांना कळवले जाते. या वर्षात मात्र असे धोरणच कळवलेले नाही. त्यामुळे कोणत्या गाड्या भंगारात काढायच्या याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

20 अग्निरोधकांची मागणी केली आहे. तसेच पुर्वीपेक्षा आता स्पेअरपार्ट लवकर उपलब्ध होत आहे. तसेच नाशिक विभागाला नवीन बसेस मिळणार असल्याने त्यामुळे मालेगाव आगाराला काही बसेस मिळतील. – किरण धनवटे, आगार प्रमुख, मालेगाव.

हेही वाचा:

The post राज्य परिवहन महामंडळ : स्क्रॅप बसेसमधून कसा होणार सुरक्षित प्रवास? appeared first on पुढारी.