राज्य लोकसेवा हक्क आयोग : नाशिक विभागात निघाले 28 लाख अर्ज निकाली

राज्य लोकसेवा आयोग www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्य लोकसेवा हक्क आयोगाच्या नाशिक विभागीय कार्यालयाला गुरुवारी (दि. 1) वर्षपूर्ती झाली. या वर्षभराच्या कार्यकाळात महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायद्यांतर्गत संबंधित कार्यालयाकडे 30 लाख 60 हजार 260 अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 28 लाख 37 हजार 875 अर्ज निकाली काढत नागरिकांना न्याय देण्याचे कार्य कार्यालयाने केले.

एप्रिल 2015 पासून राज्यात लोकसेवा हक्क कायदा लागू करण्यात आला. शासनाच्या 38 विभागांनी सुमारे 500 सेवा या कायद्याखाली अधिसूचित केल्या आहेत. या सेवा देण्याची जबाबदारी शासकीय अधिकार्‍यांवर आहे. त्यांनी वेळेवर सेवा न दिल्यास त्यांच्या वरिष्ठ अधिकार्‍याकडे अपिल दाखल करता येते. नाशिक आयोगाने एका वर्षांत 33 अपिले निकाली काढून अर्जदारांना न्याय देतानाच कर्तव्यात कसूर करणार्‍या अधिकार्‍यांना समज दिली आहे. यामध्ये विहित कालमर्यादेत सेवा दिलेल्या प्रकरणांची टक्केवारी 93 टक्के आहे. सन 2022-23 वर्षात या कायद्याच्या अनुषंगाने अपिलांव्यतिरिक्त सुमारे 15 तक्रारी अर्ज प्राप्त झाले असून, सर्व अर्जांचा वेळेत निपटारा करून नागरिकांच्या तक्रारीचे निराकरण करण्यात आले आहे.
वर्षपूर्तीनिमित्त आयोगाच्या आयुक्त चित्रा कुलकर्णी यांना राज्य माहिती आयोगाच्या उपसचिव जयरेखा निकुंभ, उपजिल्हाधिकारी गणेश मिसाळ व भीमराज दराडे, माहिती उपसंचालक ज्ञानेश्वर इगवे, वस्तू व सेवाकर अतिरिक्त आयुक्त सुभाष एंगडे, दुग्धव्यवसाय विकास अधिकारी योगेश नागरे यांच्यासह अन्य मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.

येथे साधा संपर्क…
राज्य सेवा हक्क कायद्याबाबत https://aaplesarkar.mahaonline. gov. in या संकेतस्थळावर माहिती मिळू शकते किंवा आपले सरकार या मोबाइल अ‍ॅपचा वापर नागरिक करू शकतात. अधिक माहितीसाठी राज्य लोकसेवा हक्क आयुक्त कार्यालय, नाशिक विभाग, नाशिक दूरध्वनी क्रमांक 0253-2995080, ई-मेल rtsc. nashik@gmail. com किंवा संबंधित जिल्हाधिकारी, कार्यालय येथे संपर्क साधावा.

डिसेंबर 2021 पासून राज्य सेवा हक्क आयोग नाशिक आयोगाच्या कामकाजास सुरुवात झाली. आयोगाच्या कार्यकक्षेत नाशिक, नगर, जळगाव, धुळे व नंदुरबार हे जिल्हे येतात. यापुढील काळात नागरिकांच्या गरजेच्या अधिकाधिक सेवा अधिसूचित करून त्या ऑनलाइन उपलब्ध करणे आणि या कायद्याचे महत्त्व प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणे हे आयोगाचे उद्दिष्ट आहे. – चित्रा कुलकर्णी, आयुक्त, राज्य सेवा हक्क आयोग, नाशिक.

हेही वाचा:

The post राज्य लोकसेवा हक्क आयोग : नाशिक विभागात निघाले 28 लाख अर्ज निकाली appeared first on पुढारी.