राज ठाकरेंना मानणारा मोठा वर्ग, एक दोन जणांच्या जाण्याने फरक पडत नाही : अमित ठाकरे

राज ठाकरे, अमित ठाकरे,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

पक्षातून एक-दोन लोक बाहेर पडले म्हणजे पक्ष संपला, असे होत नाही. परंतु एक-दोन लोकांना घेऊन जाण्यातून त्या पक्षांना काय मिळते कुणास ठाऊक, असा प्रश्न करत आमच्याकडे गेलेल्या माणसांना रिप्लेसमेंट असून, मनसेची पहिली क्रेझ येत्या काळात नक्कीच परत येईल, असा विश्वास मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी व्यक्त केला.

गेल्या दोन दिवसांपासून अमित ठाकरे नाशिक दौऱ्यावर आहेत. बुधवारी (दि. २८) त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. शिंदे गटात जाणाऱ्यांची संख्या वाढत असून, त्यात मनसेचे शहर समन्वयक सचिन भोसले यांच्यासह नाशिकरोड विभाग अध्यक्ष विक्रम कदम, माजी नगरसेविका मेघा साळवे यांनीदेखील शिंदे गटात प्रवेश केल्याने मनसेलाही घरघर लागली. या पार्श्वभूमीवर त्यांना विचारले असता ते म्हणाले, पक्षात लोक येत-जात असतात. आमच्याकडे भाजपच्या १५० जणांनी मुंबईत प्रवेश केला. राजकारणात या गोष्टी सुरूच असतात. लोक जात असले तरी आमच्याकडे रिप्लेसमेंट आजच तयार आहे. राज ठाकरे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. एखाद दुसरा माणूस पक्ष सोडून गेला तर काही फरक पडत नाही. इतर पक्षातील एक-एक कार्यकर्त्यास घेऊन काय मिळत माहीत नाही. पक्षसंघटनेच्या कामकाजासाठी जानेवारीत पुन्हा येणार असून, नाशिकची टीम पूर्णपणे तयार झाल्याचे त्यांनी सांगितले.

नाशिकमधील कॉलेजस्तरावर युनिट स्थापन करायचे असल्याने त्याची तयारी सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एप्रिल तसेच सप्टेंबरमध्ये होतील, अशी चर्चा सुरू आहे. तुम्हाला कळलं की मलाही सांगा, असे सांगत सध्या निवडणुकीची तयारी नसून, पक्षसंघटना बांधणीचे काम सुरू असल्याचे अमित ठाकरे यांनी सांगितले.

नाशिक माझं आवडतं शहर

नाशिकला मनसे विद्यार्थी सेनेच्या नियुक्त्यांसाठी आलो असून, नाशिक शहर हे माझे आवडते शहर असल्याने इथे यायला मला आवडते. नाशिकला येण्याचे मी कारणच शोधत असतो. सगळ्या पदाधिकाऱ्यांना मुंबईत बोलवण्याऐवजी मीच नाशिकला आलो. मागील दौऱ्यात बऱ्याच ठिकाणी भेटी दिल्या. अनेकांना विद्यार्थी नेते म्हणून काम करण्याची इच्छा असल्याचे ठाकरे म्हणाले.

हेही वाचा :

The post राज ठाकरेंना मानणारा मोठा वर्ग, एक दोन जणांच्या जाण्याने फरक पडत नाही : अमित ठाकरे appeared first on पुढारी.