राष्ट्रीय युवा दिन : दुसऱ्यांना मदत करतो तोच खरा माणूस – ऐश्वर्य पाटेकर; राज्यस्तरीय बाल शौर्य पुरस्काराचे वितरण

बाल शौर्य पुरस्कार www.pudhari.news

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा

देव मंदिरात भेटतो परंतु माणूस माणसात भेटत नाही ही आजची वस्तुस्थिती आहे. मात्र, इतरांना मदत करतो तोच खरा माणूस आहे. याची प्रचिती शौर्यवान मुलांकडे पाहिल्यानंतर येते, असे प्रतिपादन साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त ऐश्वर्य पाटेकर यांनी व्यक्त केले.

राष्ट्रीय युवा दिनानिमित्त उडान फाउंडेशनच्या वतीने दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय बाल शौर्य पुरस्कार वितरणाप्रसंगी ते लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्य मंदिरात बोलत होते. व्यासपीठावर नीता अरोरा, जिल्हा बाल न्याय मंडळाचे न्यायाधीश गणेश कानवडे, फाउंडेशनचे अध्यक्ष भरत शिंदे उपस्थित होते. फाउंडेशनकडून दरवर्षी या पुरस्कारासाठी प्रस्ताव मागवले जातात. १८ वर्षांच्या आतील मुलांना हे पुरस्कार दिले जातात. यंदाचे हे पाचवे वर्ष असून अथर्व खेडकर, यश वाजे, आर्या नवले यांना बाल शौर्य पुरस्काराने गौरवण्यात आले. अंकुश सहाणे यांनी सूत्रसंचालन केले.

बिबट्याच्या हल्यातून बहिणीला वाचवले….
पांढुर्ली (सिन्नर) येथे सातवीत शिकणारा यश वाजे (१४) बहीण तृप्ती तांबे (१७) हिला दुचाकीवरून बसस्टॅण्डकडे सोडवायला जात असताना गवतात लपून बसलेल्या बिबट्याने अचानक यशच्या पायावर झडप घातली. यावेळी यशने जोरात पाय झटकत सोडवणूक करून घेतली. त्यानंतरही बिबट्याने तृप्तीवर झडप घातली. त्यातही यशने एका हातात दुचाकीचे हॅण्डल आणि एका हातात बहिणीचा हात धरून बहिणीचे प्राण वाचवले. तसेच जखमी अवस्थेत हे दोघे भाऊ-बहीण गावापर्यंत पोहोचले. यश पांढुर्ली येथील जनता विद्यालयात इयत्ता दहावीत शिकत आहे.

आईला वाचवले…
संगमनेरमधील आर्या नवले ही इयत्ता सातवीत शिकते. तापाने आजारी असल्याने आई मनीषा नवले तिला सकाळी दवाखन्यात घेऊन जात होती. नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरून जात असताना अचानक ट्रकच्या धक्क्याने दोघी मायलेकी रस्त्यावर पडल्या. आई ट्रकखाली जात असल्याने बघून आर्याने कोणत्याही परिस्थितीचा विचार न करता, आईचा डावा हात खेचून तिला रस्त्याच्या कडेला करण्याचा प्रयत्न केला. आईचा जीव तर वाचला पण उजव्या हातावरून ट्रकचे चाक गेल्याने आई गंभीर जखमी झाली होती. मात्र, आर्याच्या समयसूचकतेमुळे तिच्या आईचे प्राण वाचले.

आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचा जीव वाचवला…
अथर्व अशोक खेडकर (१३), कोल्लूबाई कोल्हार (ता. पाथर्डी, जि. नगर) हा घराबाहेर बाहेर खेळत असताना एक महिला जिवाच्या आकांताने ओरडत आली. अथर्व धावत घरात जाऊन पाहातो, तर एका शेतकऱ्याने गळफास घेतला होता. अशावेळी समसूचकता दाखवून अथर्वने शेतकऱ्याचे पाय उचलून धरले व घरातील महिलेने दोर कापून शेतकऱ्याला खाली उतरवले. त्यामुळे एका शेतकऱ्याचा जीव वाचला.

हेही वाचा:

The post राष्ट्रीय युवा दिन : दुसऱ्यांना मदत करतो तोच खरा माणूस - ऐश्वर्य पाटेकर; राज्यस्तरीय बाल शौर्य पुरस्काराचे वितरण appeared first on पुढारी.