वर्ल्ड डिजिटल डिटॉक्स वेलनेस एजुक्शन उपक्रमास नंदुरबार येथून प्रारंभ : जिल्हाधिकारी मनीषा खत्री

नंदूरबार www.pudhari.news
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
डिजिटल डिटॉक्स व त्यासाठी शाळेमध्ये वेलनेस एजूकेशन ही एक नवीन व नाविन्यपूर्ण संकल्पना आहे. ही संकल्पना घेऊन डॉ. रेखा चौधरी या जगभरातील विविध देशांमध्ये प्रबोधनाचे काम करत आहेत. विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगात सामाजिक उपक्रम कमी व टेक्नॉलॉजीचे उपक्रम अधिक झाले आहेत. भावी पिढी त्यास ॲडीक्ट होत असल्याने त्याचे भान ओळखत संपूर्ण जगभरात सुरू असलेला वर्ल्ड डिजिटल डिटॉक्स व वेलनेस एजुक्शनचा उपक्रम भारतातून नंदुरबार येथून सुरू होत आहे. ही आपल्यासाठी आनंदाची बाब आहे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी हिरा प्रतिष्ठान येथे डिजिटल डिटॉक्स डे व वेलनेस डिजिटल डिटॉक्स तासिकेच्या उद्घाटनप्रसंगी केले.
कार्यक्रमाच्या संयोजक व भारताच्या वेलनेस ॲम्बेसेडर आणि वर्ल्ड डिजिटल डिटॉक्स डे चे फाउंडर डॉ. रेखा चौधरी यांच्या प्रेरणेतून जागतिक स्तरावरचे विषय नंदुरबार सारख्या आदिवासी जिल्ह्यात राबविण्यात येत असल्याने त्यांचा कार्याचा यावेळी गौरव करण्यात आला. अध्यक्ष म्हणून अमळनेर विधानसभेचे माजी आमदार तथा हिरा प्रतिष्ठान संस्थेचे उपाध्यक्ष शिरीष चौधरी उपस्थित होते. मोबाईल व सोशल मीडियाचे होणारे दुष्परिणाम व त्यांच्या आहारी जाणारी नवीन पिढी त्यांच्या वर्तनात झालेला बदलामुळे होणारे नुकसान याचे महत्त्व पटवून देत बौद्धिक विकासासोबत शारीरिक विकास किती गरजेचा आहे, याचे महत्त्व तसेच विद्यार्थ्यांनी व पालकांनी डिजिटल डिटॉक्स ही संकल्पना समजून घेणे व त्यानुसार बदल करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून हिरा प्रतिष्ठान संस्थेच्या संचालिका वंदना चौधरी, अनिता चौधरी, डी. आर. हायस्कूलचे प्राचार्य एन. के. भदाणे, महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डी. एस. पाटील, हिरा प्रतिष्ठान संस्थेचे सचिव रुपेश चौधरी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. डॉ. रेखा चौधरी यांनी प्रास्ताविक केले. प्रास्ताविकेतून त्यांनी वर्ल्ड डिजिटल डिटॉक्स इनोग्रेशन या कार्यक्रमाची संकल्पना, उद्दिष्ट, गरज व सुरू असलेले कार्य याविषयी माहिती दिली. आदिवासी व दुर्गम अशा नंदुरबार जिल्ह्यातून हिरा प्रतिष्ठान या शैक्षणिक संस्थेच्या अधिनिस्त सर्व शाळा व महाविद्यालय येथे उपक्रमास प्रारंभ करण्यात आला. त्याबद्दल विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमासाठी सहकार महर्षी अण्णासाहेब पि. के. पाटील, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य सुरेंद्र पाटील, इंदुबाई हिरालाल चौधरी, प्राथमिक विद्या मंदिराचे मुख्याध्यापक किरण त्रिवेदी, एस. ए. मिशन हायस्कूलचे उपप्राचार्य पवार आदींसह पालक व विद्यार्थी उपस्थित होते. अनिल चौधरी यांनी सूत्रसंचालन केले. युवराज भामरे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी हिरा प्रतिष्ठान अधिनिस्त सर्व विद्यालयाचे व महाविद्यालयाचे प्राध्यापक,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.
हेही वाचा:

The post वर्ल्ड डिजिटल डिटॉक्स वेलनेस एजुक्शन उपक्रमास नंदुरबार येथून प्रारंभ : जिल्हाधिकारी मनीषा खत्री appeared first on पुढारी.