विदर्भातील बांद्रा गावाची अनोखी कहाणी, वाचाच…

विदर्भातील बांद्रा गाव,www.pudhari.news

नाशिक : वैभव कातकाडे

हागणदारीमुक्त अशी ओळख असलेल्या आणि तब्बल तीन वेळा संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता पुरस्कार मिळविलेले बांद्रा गाव १०० टक्के आदिवासी मात्र ८० टक्के साक्षर. जिल्हा परिषदेच्या एकमेव प्राथमिक शाळेतील मुलांचे २५ पर्यंतचे पाढे इंग्लिशमध्ये तोंडपाठ. या गावात पाणीपुरवठा योजनाही पूर्ण. ही आदर्शवत परिस्थिती कोणत्या पश्चिम महाराष्ट्रातील नाही तर विदर्भातील नागपूर जिल्ह्यातील मध्य प्रदेश सीमेलगतच्या बांद्रा गावाची आहे. पेंच राष्ट्रीय उद्यान हाकेच्या अंतरावर असल्याने जंगली श्वापदांचे वास्तव्य या परिसरात आहे. साग, तेंदू आदी वनांचे जंगल या भागात आहे.

नागपूरच्या रामटेक तालुक्यातील अवघ्या ३२५ लोकवस्तीचे गाव असलेले बांद्रा. १०० टक्के आदिवासी असले तरी या गावात ८० टक्के लोक लिहिता वाचता येणारे आहेत. नागपूरपासून ९० किमी अंतरावर असलेल्या रामटेक तालुका हा महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमेवर आहे. नागपूर सुमारे 64 कि.मी. अंतरावर वसलेल्या बांद्रा गावाचे क्षेत्रफळ सुमारे 264.87 हेक्टर आहे. २०११ च्या जनगणनेनुसार या गावची लोकसंख्या 928 आहे. २०११ च्या जनगणनेनुसार सुमारे 125 कुटुंब बांद्रा गावात राहतात. तालुक्यातील पर्यायाने जिल्ह्य़ातील शेवटच्या गावात वीज पोहोचलेली आहे, मात्र या गावात पायाभूत सुविधादेखील पूर्ण झाल्या आहेत.

रामटेक तालुक्यात श्रीनगर-कन्याकुमारी एक्स्प्रेस वेवरून ५०० मीटरमध्ये आल्यावर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वसलेली आहे. त्याच्याच बाजूला राज्य शासन, केंद्र सरकारच्या योजनांचे भित्तीचित्र लक्ष वेधून घेतात. गावात असलेल्या तलावाच्या बाजूला महात्मा गांधींचा आकर्षक पुतळा लक्ष वेधून घेतो आणि तिथेच आठ-दहा पायऱ्या चढून गेल्यावर ग्रामपंचायतीचे कार्यालय समोर दिसते. उंचीवर असल्याने गावातील रस्त्यांवर आपोआप लक्ष जाते आणि गावातील सर्व वस्त्यांना जोडणारे रस्ते ठक्कर बाप्पा योजनेतून झाल्याचे लक्षात येते.

गावात असलेल्या ग्रामपंचायत कार्यालयात शहीद स्वातंत्र्यवीर बाबूराव शेडमाके यांचे छायाचित्र लक्ष वेधून घेते. १८५७ च्या लढ्यात योगदान देत ब्रिटिशांना ‘सळो की पळो’ करून सोडणाऱ्या शेडमाके यांचे शौर्य पराक्रम यांचा इतिहास जिवंत राहावा म्हणून राज्याच्या पूर्वेकडील गावागावांत त्यांच्याकडे प्रेरणास्थान म्हणून बघितले जाते.

बांद्रा गावचे सरपंच रामचंद्र अडमाची, उपसरपंच शंकर सर्याम, ग्रामसेवक मुकुंदा मरसकोल्ले हे सध्या गावाची धुरा सांभाळत आहेत. गावचा विकास किती आणि कसा झाला आहे हे कोणीही न सांगता फक्त या गावच्या रस्त्यांवरून फेरफटका मारला तरी दिसून येते. कारण गावच्या लोकांसाठी फलक लेखनातून सर्व माहिती पोहोचवली जाते. येथील कृषी कार्यालयाने पिके कोणती असावी, वातावरण कसे आहे याची इत्थंभूत माहिती फलकावर दिलेली आहे. ‌’बेटी बचाओ, बेटी पढाओ’, सर्व शिक्षा अभियानाचा तर गावभर प्रचार झालेला दिसून येतो.

गावातील शाळेत २२ विद्यार्थी आणि दोन शिक्षक असे समीकरण. शिक्षक विद्यार्थ्यांना कसे शिकवतात याचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांनी जेव्हा २४ चा पाढा एकत्रितपणे तोही इंग्लिशमध्ये तोंडपाठ म्हणून दाखवला तेव्हाच आला. या विद्यार्थ्यांना इयत्ता चौथीनंतर देवलापार या ठिकाणी पुढील शिक्षणासाठी जावे लागते. मात्र, त्याची पूर्वतयारी आणि सामाजिक शास्त्राचे धडे ते विद्यार्थी याच ठिकाणी गिरवितात.

घनकचरा व्यवस्थापनात सार्वजनिक कंपोस्ट पिटनिर्मिती, बॅटरीवरील व पायडेलची ट्रॉयसीकल वापरून कचरा गोळा करणे, प्लास्टिक कचरा साठवण्यासाठी शेड बांधणे, कुटुंबासाठी कचराकुंड्या देणे, सार्वजनिक कचराकुंड्या बसवणे, कुटुंब स्तरावर कंपोस्ट खतनिर्मिती करणे, गावस्तरीय बायोगॅस प्रकल्प उभारणे, कचरा वर्गीकरण, साठवण व कंपोस्ट प्रकल्प व्यवस्थापन करणे आदी महत्त्वाच्या विषयांवर काम करण्यात येत आहे. सांडपाणी व्यवस्थापनात सार्वजनिक व कुटुंब स्तरावर शोषखड्डा निर्मिती, स्थिरीकरण तळे, नाले व बंदिस्त गटारी, टाकाऊ प्लास्टिकचा पुनर्वापर यावर कामे सुरू आहेत.

हेही वाचा : 

The post विदर्भातील बांद्रा गावाची अनोखी कहाणी, वाचाच... appeared first on पुढारी.