विधीच्या पेपरची पुन्हा होणार पुनर्तपासणी; इतिहासात प्रथमच अशा प्रकारचा निर्णय

NIVEDAN www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

सध्या विधी शाखेच्या निकालावरून बराच गोंधळ सुरू असून, पुनर्तपासणीनंतरही विद्यार्थी अनुत्तीर्णतेचा टक्का अधिक असल्याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पुन्हा पुनर्तपासणीचा निर्णय घेतला आहे. विद्यापीठाने प्रथमच अशा प्रकारचा निर्णय घेतल्याने त्याचा विद्यार्थ्यांना लाभ होईल काय? यावरून सध्या एकच चर्चा रंगली आहे.

काही दिवसांपूर्वीच विधी शाखेचे निकाल घोषित करण्यात आले. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्याचे समोर आले. ऑनलाइननंतर प्रथमच विद्यार्थी ऑफलाइन परीक्षेला सामोरे गेल्याने त्यांच्यासमोर अनेक आव्हाने होती. मात्र, अशातही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने स्केल डाउनचा नियम लावल्याने मोठ्या प्रमाणात विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. विशेष बाब म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी चांगल्या पद्धतीने पेपर लिहिलेत, अशा विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण केल्याने, विद्यार्थ्यांना मोठा धक्का बसला. शिवाय विद्यापीठाला विद्यार्थ्यांच्या रोषालाही सामोरे जावे लागले. अशात विद्यापीठात पेपरच्या पुनर्तपासणीचा पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिला. त्यामध्येदेखील मोठ्या प्रमाणात विद्यार्थी अनुत्तीर्णच झाल्याने पुनर्तपासणी योग्य पद्धतीने केली नसल्याचा विद्यार्थ्यांकडून केला गेला. या सर्व पार्श्वभूमीवर विद्यार्थी प्रतिनिधी अजिंक्य गिते यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पुन्हा एकदा विद्यापीठाच्या प्रमुख अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी सखोल चर्चा केली असता, पुनर्तपासणी केलेल्या पेपरची पुन्हा पुनर्तपासणी केली जाईल अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आला आहे.

यावेळी शिष्टमंडळाने विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे, प्रो-कुलगुरू संजीव सोनवणे, रजिस्ट्रार पवार यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. याप्रसंगी पुनर्तपासणीत विद्यार्थ्यांना पाच ते दहा गुणांच्या फरकाने अनुत्तीर्ण केल्याच्या तक्रारी मांडण्यात आल्या. त्याचबरोबर पुनर्तपासणीदेखील योग्य पद्धतीने केली गेली नसल्याचा आरोपही केला गेला. अशात कुलगुरूंनी पुनर्तपासणी केलेल्या पेपरची पुन्हा पुनर्तपासणी केली जाईल, अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आला. विद्यापीठाच्या इतिहासात प्रथमच अशा प्रकारचा निर्णय घेतला गेला आहे. दरम्यान, याप्रसंगी तुषार दोंदे, शशी उन्हवणे, सुनील निरभवणे, शाकीर कुरेशी, सोनाली कुमावत, कोमल गोळे, मंजूषा पवार, शक्ती पेंढारकर, सचिन डेंगळे, भाग्यश्री मघाडे, विलास ठाकरे, राहुल पाखरे आदी उपस्थित होते.

हेही वाचा:

The post विधीच्या पेपरची पुन्हा होणार पुनर्तपासणी; इतिहासात प्रथमच अशा प्रकारचा निर्णय appeared first on पुढारी.