विरोधकांना काही काम धंदा नाही, ते प्रत्येक गोष्टीत राजकारण करताय : उदय सामंत

उदय सामंत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे आमची जबाबदारी आहे. जातीय तेढ निर्माण करणे योग्य नाही. महाराष्ट्रात अशा पद्धतीचे वाद-विवाह होऊ नयेत. जातीय सलोखा राखला जावा, अशी प्रतिक्रया उद्योगमंत्री उदय सामंत यांनी त्र्यंबकेश्वर येथील घटनेवर दिली. तसेच या प्रकरणी एसआयटी स्थापन केली असून, त्यावर राजकीय बोलणे योग्य नसल्याचे सांगताना, विरोधकांना काही कामधंदा नसल्यानेच ते प्रत्येक गोष्टीत राजकारण करू पाहत असल्याची टीकाही ना. सामंत यांनी केली.

निमा पॉवर प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी नाशिक येथे आलेल्या ना. सामंत यांना त्र्यंबकेश्वर येथील घटनेबाबत विचारले असता, त्यांनी अशा प्रकारचे आरोप-प्रत्यारोप महाराष्ट्रासाठी नक्कीच भूषणावह नाहीत. सध्या या प्रकरणी एसआयटीचा तपास सुरू असून, सत्य परिस्थितीसमोर येईल, असेही त्यांनी याप्रसंगी सांगितले. इलेक्ट्रॉनिक क्लस्टरबाबत बोलताना ते म्हणाले की, निमा पॉवर प्रदर्शनाला येण्यापूर्वीच पालकमंत्री दादा भुसे यांच्याशी प्राथमिक चर्चा झाली होती. सध्या एमआयडीसीकडून मोठ्या प्रमाणात जागा अधिग्रहीत केली जात आहे. त्यामुळे क्लस्टरची जागा निवडण्याचे अधिकार आम्ही पालकमंत्र्यांना दिले आहेत. त्यामुळे पालकमंत्री आणि निमाकडून जी जागा ठरविली जाईल, त्याठिकाणी क्लस्टर उभारण्याचा निर्णय एमआयडीसी आणि उद्योगविभागाने घेतल्याचे त्याने स्पष्ट केले.

बारसू प्रकल्पाबाबत सकारात्मक

बारसू प्रकल्पाबाबत सकारात्मकदृष्ट्या सर्वांना विश्वासात घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत. स्टील उद्योगांमधून मोठा रोजगार निर्माण होतो. त्यामुळेच हा प्रकल्प येथे साकारण्याचा प्रयत्न आहे. खरं तर अनेक ठिकाणी प्रकल्प येत असताना गैरसमजातून विरोध होत असतो. त्यामुळे जो उद्योजक उद्योग आणतो, त्याचे स्पष्टीकरण चांगल्या पद्धतीने दिल्यास गैरसमज राहत नाही.

निवृत्तिनाथ महाराजांची यात्रा शांततेत : भुसे

त्र्यंबकेश्वर येथे निवृत्तिनाथ महाराजांची यात्रा होऊ घातली आहे. अशात त्र्यंबकेश्वर प्रकरणाचा यात्रेवर परिणाम होईल काय? याविषयी पालकमंत्री दादा भुसे यांना विचारले असता, तोपर्यंत परिस्थिती निवळली जाणार असून, यात्रेअगोदरच वातावरण शांत होईल, असा विश्वास व्यक्त केला. त्याचबरोबर एसआयटी चौकशीबाबत समाधान व्यक्त केले.

हेही वाचा :

The post विरोधकांना काही काम धंदा नाही, ते प्रत्येक गोष्टीत राजकारण करताय : उदय सामंत appeared first on पुढारी.