वीज गेली? जरा धीर धरा, रागावू नका; महावितरणच्या अधिकाऱ्यांची विनवणी

वीज गेल्यावर,www.pudhari.news

दीपक श्रीवास्तव :  पुढारी वृत्तसेवा नाशिक  

विजेचा धक्का बसून मृत्यू होण्याच्या अनेक घटना वेळोवेळी घडत असतात अशा घटनांमुळे अनेक कुटुंबे देखील उद्धस्त होऊन जातात. शेतात पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा इलेक्ट्रिक मोटर सुरू करताना दुर्दैवी मृत्यू ओढवल्याच्या पार्श्वभूमीवर विद्युत वितरण कंपनीची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता निफाड (जि. नाशिक) मध्ये कार्यरत असलेले महावितरण कंपनीचे उपअभियंता गणेश कुशारे यांनी अनेक महत्त्वपूर्ण गोष्टींवर प्रकाश झोत टाकला.

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार पक्षी, सरडा, साप, माकड, असे पशू पक्षी किंवा मानव प्राणी विद्युत तारांच्या संपर्कात आल्यास किंवा लाईनवर झाडाची फांदी पडल्याने, वाहनाची धडक बसल्यास किंवा विज चोरी करीत असताना अपघात झाल्यास फिडर मधून होणारा वीज प्रवाह खंडित होत असतो.

अचानक असा वीज प्रवाह खंडित झाल्यास तो तत्काळ पूर्ववत करणे धोक्याचे असते. दुर्दैवाने कुठे अपघात झालेला असल्यास त्या ठिकाणावरून संबंधित व्यक्ती विज कंपनीच्या अधिकाऱ्यांना फोन करून कळवण्याचा प्रयत्न करत असतात, परंतू त्याचवेळेस काही उतावीळ लोक थोडाही संयम न बाळगता विजपुरवठा पुर्ववत करावा यासाठी फोन करण्याचा धडाका सुरु करतात. जिथे अपघात झालेला असतो, तेथील व्यक्ती मदतीसाठी फोन लावण्यासाठी प्रयत्न करीत असताना उतावीळ लोकांमुळे त्याचा फोन वेटींग मधे अडकतो.  त्यामुळे लाईट गेल्यावर नागरिकांनी कमीत कमी 5 मिनिटे संयम ठेवला पाहिजे. यामुळे एखाद्याचा जीव वाचू शकतो. फिडर ट्रिप झाल्यावर 5 मिनिटाच्या आत कुणीही जरी फोन केला, तरी विजेचा पुरवठा पूर्ववत सुरू केला जात नाही यामागे असे कारण असते.

त्यामुळे आपल्या घरातील शेतातील वीजपुरवठा काही काळासाठी बंद पडला तरी रागवू नये, संयम ठेवावा. दुरुस्ती पूर्ण झाली की लगेच वीज पुरवठा सुरू केला जातो असे कळकळीचे आवाहन वीज वितरण कंपनीच्या अधिकारी वर्गाकडून केले जात आहे.

२०१९ साली निफाड येथे एका व्यक्तीस ट्रक वरील प्लास्टिक कागद काढताना जोरदार शॉक बसला, परंतु सुदैवाने वितरण कंपनीचे फिडर हे स्वयं चलित असल्यामुळे ट्रिप होऊन विद्युत पुरवठा बंद झाला, अपघाताची सूचना तात्काळ काही जागृत नागरिकांनी विद्युत वितरण कंपनीला संपर्क करून कळवल्यामुळे सदर व्यक्तीचा जीव बचावला.

 विजेशी खेळ करू नका ते जीवघेणे ठरू शकते.

गावाला वीज पुरवठा करणाऱ्या फिडर च्या तारांमधून 11000 व्होल्ट इतक्या प्रचंड क्षमतेचा वीज प्रवाह वाहत असतो. क्षणात जिवंत माणसाचा कोळसा करण्याची ताकद या वीज प्रवाहात असते. शेतामधील विद्युत पंप साठी थ्री फेज द्वारे 415 व्होल्ट क्षमतेचा विद्युत प्रवाह वाहतो. तर घरगुती वापराच्या साधनांसाठी सिंगल फेज 230 व्होल्ट विज पुरवठा होतो. या कोणत्याही विद्युत प्रवाहाशी मानव किंवा सजीव प्राण्याचा संपर्क झाल्यास प्राण जाण्याची भीती असते.

सुरक्षिततेची काळजी न घेता वीज उपकरणे हाताळणे, विद्युत प्रवाहाच्या संपर्कात येणे हे जीवाशी खेळण्यासारखे आहे. अनेकदा अपघात हे निष्काळजीपणामुळेच होत असतात. घराची गच्ची किंवा टेरेस जवळून जाणाऱ्या वीजतारा जवळ दक्षता बाळगणे गरजेचे असते. कपडे वाळत घालताना किंवा खेळताना या विद्युत तारांचा संपर्क झाल्यास संबंधित व्यक्ती दगावू शकते.

काही वर्षांपूर्वी निफाड येथे एका इमारतीला रंग देत असताना लोखंडी शिडीचा स्पर्श विजतारांना झाल्याने रंगकाम करणाऱ्या मजुराचा मृत्यू ओढवलेला होता. मिरवणूक, गणेशोत्सव, नवरात्र, रंगपंचमी आणि पतंगोत्सवाच्या दिवसांमध्ये विजेचा धक्का बसण्याचे अपघात अनेक वेळा घडतात. त्यामुळे सर्वांनी काळजीने वागणे गरजेचे आहे.

हेही वाचा :

The post वीज गेली? जरा धीर धरा, रागावू नका; महावितरणच्या अधिकाऱ्यांची विनवणी appeared first on पुढारी.