वेगावर स्वार मृत्यू

नाशिक (एक शून्य शून्य) : गौरव अहिरे

बहुतांश अपघातांमध्ये वेगावर नियंत्रण नसल्याने मृत्यू होत असल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे. त्यामुळे वाहनांचा वेग आपल्या सोयीसाठी असून, मृत्यूला निमंत्रण देण्यासाठी नव्हे, हे वाहनचालकांनी लक्षात घेतले पाहिजे. सर्वाधिक अपघाती मृत्यू हे महामार्गांवर होत असून, त्याखालोखाल शहरातील रस्त्यांवर मृत्यू वेगावर स्वार होऊन फिरत आहे. वाहतूक नियमांचे पालन न केल्यास अपघात झाल्यास मृत्यूला हुलकावणी देणे जवळपास अशक्य होत असल्याचे चित्र आहे.

सिन्नर – मोहदरी घाटात भरधाव कारवरील नियंत्रण सुटल्याने ती कार रस्ता दुभाजक ओलांडून समोरून येणार्‍या कारवर जाऊन आदळली. त्यात कारमधील आठपैकी पाच अल्पवयीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. त्याचप्रमाणे भरधाव बसने दुचाकीस्वारांना चिरडले, त्यात बसला आग लागली, तर ऑक्टोबर महिन्यात बस आणि मालवाहू ट्रकच्या अपघातात खासगी बसमधील चालकासह 13 प्रवाशांचा जळून मृत्यू झाला. या घटनांनी वाहनांचा वेग पुन्हा उजेडात आला. मात्र, दररोज वेगामुळे छोटे-मोठे अपघात होत असून, त्यात जिल्ह्यात किमान एकाचा मृत्यू होत आहे. देशातील सर्वाधिक अपघातप्रवण क्षेत्र नाशिक जिल्ह्यात असल्याची दुर्दैवी बाब गत वर्षी उजेडात आली. बेशिस्त चालकांवर कारवाई करून, वाहतूक उपाययोजना किंवा प्रबोधन करूनही चालकांमध्ये वाहतूक नियमांचे महत्त्व लक्षात येत नसल्याने अपघातांचे सत्र थांबत नाही. जानेवारी 2017 ते मे 2022 या कालावधीत शहरात 952 जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे. त्यात बहुतांश मृत्यू वेगवान वाहनांमुळे झाला आहे. पादचार्‍यांनाही भरधाव वाहनांनी धडक दिल्याने त्यांना नाहक जीव गमवावा लागला आहे. त्याचप्रमाणे अपघातांमध्ये लहान बालकांचाही जीव गेला आहे. वेगामुळे स्वत:सह इतरांचाही जीव धोक्यात येत असल्याची बाब काही चालक लक्षात घेत नाहीत. वेग आपल्या कामांच्या सोयीसाठी आहे, हे विसरल्याने वेगाची नशा करीत चालक स्वत:सह इतरांची शारीरिक, कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक हानी करीत आहेत. वाहन चालवताना इतरांशी स्पर्धा करणे प्राणघातक ठरत असते. ज्या ठिकाणी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध असेल, तेथे तिचा वापर केल्यास रस्त्यांवरील वाहनांची संख्या कमी होऊन अपघातही घटतील. मात्र, अनेकांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेऐवजी स्वत:च्या वाहनांवर विश्वास असल्याने रस्त्यांवरील वाहनांच्या संख्येचा आलेख चढता आहे. त्या तुलनेने रस्ते प्रशस्त नाही किंवा वाढलेले नाही. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या कायमचीच असून, रात्री रस्त्यांवर वाहने नसल्याने अनेक जण त्यांची वाहने वेगाने चालवत असतात. त्यामुळेही रात्रीच्या वेळेत सर्वाधिक अपघात व अपघाती मृत्यू होत असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे आपली कामे वेगात मात्र सुरक्षितरीत्या होण्यासाठी वाहनांचा वापर करणे आवश्यक आहे.

हेही वाचा:

The post वेगावर स्वार मृत्यू appeared first on पुढारी.