शिवसेना नेते खासदार संजय राऊत : शिंदे-फडणवीस सरकार फेब्रुवारी महिना बघणार नाही

संजय राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शिंदे गटाचे 16 आमदार कायद्यानुसार अपात्र ठरले, तर शिंदे-फडणवीस सरकार फेब्रुवारी महिना बघणार नाही, असा विश्वास शिवसेनेचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी केला. सध्याचे सरकार हे व्हेंटिलेटरवर आहे. ते काढले की, त्यांचा हे राम झालेच म्हणून समजा. सरकार केवळ 40 आमदारांचे आहे. नागपूर अधिवेशनात मंत्र्यांच्या घोटाळ्याबाबत पुरावे देऊनही सरकार पाण्यात बसलेल्या म्हशीसारखे ढोंग घेत असल्याचा आरोप खा. राऊत यांनी केला.

नाशिक दौर्‍यावर आलेल्या राऊतांनी शनिवारी (दि. 7) पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारवर हल्लाबोल केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत नागपूर येथे विधिमंडळ अधिवेशनास गेलो होतो. त्यावेळी सरकारचा गोंधळ जवळून पाहता आला. मुळात सरकार अस्तित्वातच नाही. गेंड्याच्या कातडीचे सरकार आहे. मुख्यमंत्र्यांसह उदय सामंत, अब्दुल सत्तार यांच्या घोटाळ्यांचे पुरावे देऊनही सरकार मात्र ढिम्म आहे. याउलट सत्ताधारी हे विरोधकांनाच गुन्हेगार ठरवत आहे. यापूर्वी मुख्यमंत्री असताना बॅरिस्टर अंतुले, शिवाजीराव निलंगेकर यांनी आरोप झाले आणि पद सोडण्याची नैतिकता दाखवली होती. मात्र ही नैतिकता आताच्या शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अजिबात दिसत नाही. राज्यात केवळ एकच खरीखुरी शिवसेना आहे आणि ती म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना. सध्या उद्धव ठाकरेंकडे नेतृत्व असलेली शिवसेना. बाकी गट-तट काहीही नाही. सध्या आग ओकणार्‍यांचा धूर होऊन लवकरच हे गटही विसर्जित होतील, असा विश्वासही खासदार राऊत यांनी व्यक्त केला. राज्यात परिवर्तनाचे वारे वाहात आहे आणि त्या जोरावरच 2024 मध्ये सत्तापालट होईल. परंतु, तत्पूर्वी संविधान आणि कायद्यानुसार निर्णय झाल्यास राज्य सरकार फेब्रुवारी महिना बघणार नाही, असा दावा त्यांनी केला.

नारायण राणेंचे मंत्रिपद जाणार : खासदार राऊत यांनी पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा पुन्हा एकदा समाचार घेतला. ठाकरे कुटुंबाबाबत राऊत काय म्हणाले, हे उद्धव ठाकरे यांना भेटून सांगणार असल्याचे ना. राणे यांनी म्हटले होते. याबाबत राऊतांना विचारले असता, ते म्हणाले, मी राणेंना कधीच भेटलो नाही आणि बेईमानांना तर कधीच भेटत नाही. याबाबत उद्धव ठाकरेंशी माझे बोलणे झाले. मी त्यांना राणेंविषयी सांगितले, तर उद्धव ठाकरे हसल्याचे राऊतांनी सांगितले. कधीकाळी हेच राणे मोदी आणि शहा यांच्यावर चिखलफेक करत होते. आता आहे त्या पक्षात तरी त्यांनी निष्ठा दाखवावी, असा टोला लगावत, पक्षातील त्यांची कामगिरी पाहता आणि शिंदे गटातील खासदारांना मंत्रिपद द्यावे लागणार असल्याने राणे यांचे मंत्रिपद जाणार असल्याचा दावा राऊत यांनी केला.
गोडसेंसह अनेकजण तुरुंगात जाणार : शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांनी एका महिलेचा पेट्रोल पंप बळकावल्याचा आरोप होत आहे. त्याविषयी विचारले असता राऊत म्हणाले, गोडसेंची अशी अनेक प्रकरणे आहेत. त्यांच्यासह सरकारमधील अनेकजण तुरुंगात जातील.

.. तर राऊत खासदार होऊ शकले नसते
लव्ह जिहादसंदर्भात स्वतंत्र कायदा करावा, यासह विविध मागण्यांसाठी शनिवारी (दि.7) जळगावात हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला ना. पाटील यांनी भेट दिली. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मनोगतात त्यांनी विरोधकांवर तसेच संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. अनेकजण आमच्यावर टीका करत आहेत. मात्र, आम्ही शिवसेना वाचवण्यासाठी बाहेर पडलो असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

संजय राऊतांवर टोलेबाजी…. : संजय राऊत यांनी शिंदे गटाचा कुणीही आमदार, खासदार निवडून येणार नाही, अशी टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर गुलाबराव पाटील यांनी दिले आहे. ते म्हणाले, संजय राऊतांना 41 मते पडली ती एकनाथ शिंदे यांच्यामुळे पडली आहे म्हणून तर ते निवडून आले आहे. आपण पक्ष बाजूला ठेवला, धर्मच टिकला नाही तर तुमचा पक्ष कुठे वाचणार आहे, अशी कोपरखळीही संजय राऊत यांना त्यांनी मारली आहे.

खुर्चीपेक्षा हिंदुत्व महत्त्वाचे… : राज्यातील ग्रामीण भागात पाड्यांवर धर्मांतरणाचे काम जोरात सुरू आहे. आम्ही कुणाच्याही धर्मावर बोट ठेवत नाही, मात्र आमच्या धर्माकडे कुणी वाकड्या नजरेने पाहिल्यास कदापि सहन करणार नाही. आज मी मंत्री किंवा आमदार आहे यापेक्षा मी हिंदू आहे हे महत्त्वाचे आहे. खुर्चीपेक्षा धर्म महत्त्वाचा आहे. हिंदू धर्माविरुध्द कारस्थान केल्यास सडेतोड उत्तर देणार असा इशाराही गुलाबराव पाटील यांनी दिला.

हेही वाचा:

The post शिवसेना नेते खासदार संजय राऊत : शिंदे-फडणवीस सरकार फेब्रुवारी महिना बघणार नाही appeared first on पुढारी.