शिवसेना फोडण्यात संजय राऊतांचा सिंहाचा वाटा : गिरीश महाजनांचा घणाघात

गिरीश महाजन,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शिवसेना फोडण्यात संजय राऊत यांचा सिंहाचा वाटा आहे. ज्या पद्धतीने राऊत हे पवार साहेबांच्या मांडीवर जाऊन बसले, त्यामुळे कट्टर शिवसैनिक नाराज झाले आणि त्यांनी हे पाऊल उचलले. खऱ्या अर्थाने राऊतांनी शिवसेनेला सुरुंग लावला. शिंदे-फडणवीस सरकार येण्याचे श्रेय त्यांचेच आहे. मातोश्रीवर ज्यावेळी काही आमदार गेले, त्यांना संजय राऊत म्हणाले, तुम्हाला जायचे असेल, तर तुम्हीही जा. या शब्दात ते शिवसेनेच्या आमदारांसोबत बोलले होते, असे वक्तव्य ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी केले.

नाशिकमध्ये एका कार्यक्रमात प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. संजय राऊत नेहमीच आरोपांचे बॉम्ब आणतात पण ते फुसके निघतात. बोलण्याशिवाय त्यांच्याजवळ दुसरे काही साधन नाही. गेल्या वेळी त्यांनी बॉम्ब तयार केला होता मात्र तो फुटला नाही. त्यामुळे आता त्यांना कोणी गांभीर्याने घेत नाही, असा टोला ना. महाजन यांनी लगावला.

विरोधी पक्षाबाबत त्यांनी आंदोलन करणे, सभागृह चालू न देणे, हे विरोधी पक्षाचे कामच आहे. ते सभागृहात बसले काय किंवा नाही बसले काय, आमचे काम सुरू आहे. आमची संख्या जास्त आहे, तरीदेखील आम्ही त्यांची मनधरणी करू. जयंत पाटील यांच्या निलंबनावर त्यांचे निलंबन हा विषय धरून चालणार नाही. आमच्यादेखील 12 लोकांना निलंबित केले होते. आम्ही न्यायालयात गेलो. त्यांनी आम्हाला आत घेतले. जयंत पाटील जे बोलले ते चुकीचे आहे. त्याचे समर्थन कोणीही करणार नाही.

आदित्य ठाकरे यांच्याबाबत बोलताना, शिंदे फडणवीस सरकार यांचे काम उत्तम आहे. लोकांची कामे होत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी हतबल झाली आहे. फौज उभी करून, कार्यकर्ते उभे करून चौकशीवर काहीही परिणाम होणार नाही. जे सत्य आहे ते समोर येईल, असा दावा ना. महाजन यांनी केला.

शहराध्यक्षांबाबत प्रदेशाध्यक्ष निर्णय घेणार

भाजप शहराध्यक्षांबाबत अद्याप तक्रार नाही. भाजपच्या नाशिक शहरात काम चांगले आहे. नाशिक शहराध्यक्ष बदलाबाबत प्रदेशाध्यक्ष बावनकुळे निर्णय घेणार आहेत.

हेही वाचा :

The post शिवसेना फोडण्यात संजय राऊतांचा सिंहाचा वाटा : गिरीश महाजनांचा घणाघात appeared first on पुढारी.