शेतकर्‍यांसाठी विशेष कृती आराखडा ; मुख्यमंत्री शिंदे यांची महत्त्वपूर्ण घोषणा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्यातील सरकार हे कष्टकरी जनता, वारकरी, शेतकर्‍यांचे आहे. त्यांच्या हिताचे निर्णय झपाट्याने सरकार घेत आहे. भू-विकास बँकेच्या शेतकर्‍यांची कर्जमाफी असो, अथवा शेतकर्‍यांची नुकसानभरपाई असो तसेच नियमित कर्ज फेडणार्‍या शेतकर्‍यांचे तातडीने कर्ज मंजूर प्रकरणे असोत, आम्ही शेतकरी हिताचे निर्णय घेण्याला अग्रक्रमाने प्राधान्य देत आहोत. शेतकर्‍यांच्या शाश्वत विकासासाठी विशेष कृती आराखडा तयार करण्याचे काम सरकारकडून सुरू असल्याची महत्त्वपूर्ण माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिकमध्ये दिली.

नासिक सहकारी साखर कारखानाच्या 2022-23 च्या गळीत हंगामाच्या प्रारंभाप्रसंगी ते बोलत होते. पालकमंत्री दादा भुसे, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, उत्तर प्रदेशचे राज्यमंत्री तरुण राठी, खासदार हेमंत गोडसे, आमदार हिरामण खोसकर, देवयानी फरांदे, किशोर दराडे, अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष हरगिरी महाराज, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे, मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हा परिषदेच्या सीईओ आशिमा मित्तल, उपजिल्हाधिकारी वासंती माळी, नीलेश श्रींगी, कारखान्याचे कार्यकारी संचालक सुकदेव शेटे, दीपक चंदे, सागर गोडसे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, यंदाच्या हंगामासाठी ऊस लागवडीचे क्षेत्र वाढले असून, सरासरी 95 टन प्रति हेक्टर ऊस उत्पादन अपेक्षित आहे. तसेच या हंगामात 203 कारखाने सुरू होऊन 138 लाख टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज आहे.

 

The post शेतकर्‍यांसाठी विशेष कृती आराखडा ; मुख्यमंत्री शिंदे यांची महत्त्वपूर्ण घोषणा appeared first on पुढारी.