संकटमोचकाचे कमबॅक!

गिरीश महाजन

नाशिक : कॅलिडोस्कोप – ज्ञानेश्वर वाघ

निवडणूक असो… पक्षातील अंतर्गत वाद असाे की, सरकारविरुद्ध ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे आंदोलन असो. या सर्व बाबींमध्ये तोडगा आणि मार्ग काढायचा असेल तर भाजपकडून संकटमोचक म्हणून ख्याती असलेल्या ना. गिरीश महाजनांचे नाव पुढे केले जाते. महाविकास आघाडीच्या आधी सत्ता असलेल्या युतीच्या काळात याच महाजनांच्या हाती नाशिकचे पालकमंत्रिपद सोपविण्यात आले होते. त्या पाच वर्षांच्या काळात महाजनांनी नाशिक महापालिकेवर सलग पाच वर्ष भाजपची सत्ता टिकवून ठेवण्यात बाजी मारली. शिवसेनेसह दोन्ही काँग्रेसकडून भाजपमधील नगरसेवक फोडाफोडीचे महापौरपदाच्या निवडणुकीवेळी मोठे प्रयत्न झाले. मात्र त्याला संकटमोचक महाजन यांनी आपल्या खास शैलीने उत्तर देत भाजपची सत्ता खेचून आणण्यात यश मिळविले. महापालिकेची आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि राज्यात पुन्हा भाजप-शिंदे गटाची सत्ता स्थापन झाल्यानंतर महाजनांच्या हाती नाशिकचे पालकमंत्रिपद पुन्हा सोपविण्यात येत आहे. यामुळे नाशिकसाठी त्यांचे इनकमिंग भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसाठी नक्कीच बळ देणारे ठरणार आहे.

भाजपबरोबरचे संबंध तुटल्यानंतर शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत महाविकास आघाडी तयार करत सरकार स्थापन केले. यामुळे अडीच वर्ष भाजपला सत्तेबाहेर रहावे लागले. या सर्व स्थितीमुळे भाजपमधील नगरसेवकांना गळती लागण्याची शक्यता निर्माण झाली होती. तशी चर्चा आणि तयारीही भाजपमधील अनेक नगरसेवकांनी केली होती. यामुळे भाजपची अवस्था २०१७ च्या निवडणुकीप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसारखी होतेय की काय अशीच चिन्हे दिसू लागली होती. मनसेतून जवळपास ३० ते ३५ नगरसेवकांनी अन्य पक्षांमध्ये उडी मारली होती. त्याच पध्दतीने भाजपमधूनही अनेक नगरसेवक बाहेर पडण्याच्या तयारीत होते. केवळ प्रवेश बाकी राहिले होते. परंतु, शिवसेनेतून नाराज होत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेतील ४० आमदार आणि अपक्ष १० असे ५० आमदार बाहेर पडले आणि भाजपबरोबर युती करत सत्ता स्थापन केली आहे. या सत्तेमुळे भाजपला बळ मिळाल्याने खिंडार पडण्याआधीच भाजप सावरली गेली असेच म्हणावे लागेल. महापालिका निवडणुकीत खरी टस्सल शिवसेना आणि भाजप या दोन पक्षांमध्येच होणार आहे. यामुळे शिवसेनेला अधिकाधिक खिंडार कसे पडेल, असा भाजप आणि शिंदे गटाचा प्रयत्न असेल. त्याचाच एक भाग म्हणून भाजपकडून गिरीश महाजन यांच्यावर नाशिकचे पालकमंत्रिपद सोपवून नाशिक महापालिका निवडणुकीची रणनीती आखण्यात येणार आहे. ध्वजारोहणासाठी महाजन यांचेच नाव सरकारकडून निश्चित करण्यात आल्याने त्यांच्या पालकमंत्री पदावर देखील शिक्कामोर्तब झाल्याचे समजते. यामुळे नाशिकमधील भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये निवडणुकीसाठी बळ निर्माण होणार आहे.

नाशिककरांना न्याय मिळेल का?

मागील पाच वर्षात भाजपमध्ये महापौर, उपमहापौर, स्थायी समिती आणि पक्षाच्या पदाधिकारी, आमदारांमध्ये फारसे सख्य दिसून आले नाही. या काळात संबंधितांची कानउघडणी करण्याबरोबरच त्यांना वठणीवर आणण्याचे काम महाजनांकडून झाले. यामुळे त्यांचा वचकही पक्षात असल्याने आगामी महापालिकेच्या दृष्टीने ही जमेची बाजू ठरणार आहे. परंतु, नाशिक मनपात सत्ता असताना पाच वर्षात त्यांनी दिलेल्या अनेक आश्वासनांची पूर्तता होऊ शकली नाही. दर पंधरा दिवसांनी येऊन शहराच्या कामकाजाचा आढावा घेण्याबाबत त्यांनी अनेकदा आश्वासन दिले. मात्र त्याकडे महाजन यांचे साफ दुर्लक्ष झाले. त्यामुळेच नाशिक महापालिकेतील सत्तेच्या काळात शेवटी शेवटी अंतर्गत भांडणतंटे झाले. महत्वाच्या कामांकडे दुर्लक्षही झाले. त्यामुळे किमान आता कमबॅक झाल्यास नाशिक शहराच्या विकासाच्या अनुषंगाने ते योग्य लक्ष पुरवतील आणि नाशिककरांना वेळ देतील, अशी अपेक्षा आहे.

हेही वाचा:

The post संकटमोचकाचे कमबॅक! appeared first on पुढारी.