संजय राऊतांना भुजबळांच्या शुभेच्छा, म्हणाले ईडीच्या कायद्यात लवकर जामीन मिळत नाही…पण,

छगन भुजबळ,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
ईडीच्या कायद्यात लवकर जामीन मिळत नाही. परंतु, काही मार्ग निघाला तर त्यांना आमच्या शुभेच्छा! अशा स्वरूपाच्या शुभेच्छा माजी उपमुख्यमंत्री आ. छगन भुजबळ यांनी सध्या ईडीच्या ताब्यात असलेले खासदार संजय राऊत यांना दिल्या आहेत. दरम्यान, ईडीसंदर्भातील कायदे काँग्रेसच्या काळात तयार झाले आहेत. यामुळे भाजपला काय नावे ठेवायची, असा प्रश्नही आ. भुजबळ यांनी उपस्थित केला.

आ. भुजबळ यांना खा. संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतल्याबाबत विचारले असता ते म्हणाले की, नॅशनल हेरॉल्ड प्रकरण आणि इतरही प्रकरणांविषयी सर्व विरोधी पक्षांनी ईडी हा राक्षसी कायदा असून, त्यात बदल करण्याची मागणी केली आहे. त्यास आमचा पाठिंबा आहे. यूपीएच्या काळात हा कायदा झाला असून, त्याचे शिल्पकार माजी केंद्रीय मंत्री तथा कायदेतज्ज्ञ पी. चिदंबरम असल्याचे आ. भुजबळ यांनी सांगितले. कायदे काँग्रेसच्या काळात झाले असून, आता तर सर्वोच्च न्यायालयानेदेखील ईडीसंदर्भात शिक्कामोर्तब केल्याने भाजपला नावे कशी ठेवणार, असा प्रश्न उपस्थित करत असे असल तरी कायद्यांमध्ये काय तोडगे काढता येऊ शकतात यासाठी सर्व विरोध पक्ष प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

एकनाथ शिंदे हे महाविकास आघाडीतच होते. पण, आता प्रभाग रचना का बदलली सांगता येणार नाही. जे उमेदवार असतात त्यांना वॉर्ड बदलला तर त्रास होतोच. राज्यपालांकडे आम्ही मागणी केली की पूरग्रस्तांना, शेतकर्‍यांना मदत करा. 92 नगरपालिका, चार नगरपंचायतींमध्ये ओबीसी आरक्षण लागू नाही. बांठिया कमिशनमध्ये ओबीसीची संख्या कमी दाखवली जात असल्याने त्यातील अनेक त्रुटी दूर करण्याची गरज आहे. त्यासाठी तुम्ही लक्ष घालावे, अशी मागणी केल्याचे आ. भुजबळ यांनी सांगितले.

हेही वाचा :

The post संजय राऊतांना भुजबळांच्या शुभेच्छा, म्हणाले ईडीच्या कायद्यात लवकर जामीन मिळत नाही...पण, appeared first on पुढारी.