संयोगीताराजे यांच्या पोस्टवर महंत सुधीरदास यांचा खुलासा; म्हणाले, संकल्प मंत्रामुळे गैरसमज

संयोगीताराजे भोसले,www.pudhari.news

नाशिक  (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा

युवराज संभाजीराजे यांच्या दीर्घायुष्यासाठी पूजेत संकल्प करतेवेळी ‘पुराणोक्त’ या शब्दाचा उल्लेख झाल्याने संयोगीताराजे यांनी आक्षेप घेतला. पूजाविधी ‘वेदोक्त’ केला असून, असा संकल्प भारतात सर्वत्र एकसारख्या पद्धतीने केला जात असल्याचे त्यांना सांगितले होते. हा विषय गैरसमजातून झाला असल्याचा खुलासा महंत सुधीरदास पुजारी यांनी केला. लवकरच कोल्हापूर येथे जाऊन छत्रपती शाहू महाराज, युवराज संभाजीराजे व संयोगीताराजे यांची भेट घेणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

‘वेदोक्त’ प्रकरणी शुक्रवारी (दि.31) पुजारी यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी ते म्हणाले की, माजी खासदार छत्रपती युवराज संभाजीराजे यांचा जन्मदिवस नाशिकमध्ये साजरा करण्यात आला. त्यांच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी, दि.10 फेब्रुवारी रोजी संयोगीताराजे यांनी काळाराम मंदिरात येऊन प्रभू रामचंद्रांचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी मंदिरात श्रीरामरक्षा व महामृत्युंजय मंत्राचे पठण केले. तसेच युवराज संभाजीराजे यांच्या दीर्घायुष्यासाठी पूजा केली. सर्व पूजाविधी झाल्यानंतर संकल्प करतेवेळी श्रुती, स्मृती, पुराणोक्त… असा मंत्रोच्चार सुरू असताना संयोगीताराजे यांनी ‘पुराणोक्त’या शब्दावर आक्षेप घेत पूजा ‘वेदोक्त’ करण्याचा आग्रह धरला. यावर पूजाविधी हा वेदोक्त पद्धतीने करण्यात आला असून, जो संकल्प सांगितला जातो त्यात श्रुती म्हणजे वेद, सर्व स्मृती व सर्व पुराण यांचे जे फळ आहे ते आपल्याला मिळो, असा या संकल्पाचा अर्थ होत असल्याचे त्यावेळी सांगितले होते. आणि हाच संकल्प विधी संपूर्ण भारत देशात हिंदू पूजाविधी करताना सारखाच असल्याचे सांगितले होते. यावेळी त्यांना कोणत्याही प्रकारची अडवणूक अथवा अपमानास्पद वागणूक दिली गेली नव्हती. हा सर्व प्रकार गैरसमजातून निर्माण झाला असून, काळाराम मंदिराचे वासंतिक नवरात्र उत्सव संपन्न झाल्यावर मी स्वतः कोल्हापूर येथे त्यांच्या निवासस्थानी जाऊन छत्रपती शाहू महाराज, युवराज संभाजीराजे आणि संयोगीताराजे यांची भेट घेणार असल्याचे यावेळी महंत सुधीरदास पुजारी यांनी सांगितले.

संयोगीताराजे यांनी या संबंधी सोशल मीडियावर मेसेज व्हायरल करण्यामागे काय हेतू आहे हे मला सांगता येणार नाही. त्यांचा माझ्यावर काही आक्षेप असल्यास त्यांनी मला वैयक्तिक सांगायला हवे होते. वासंतिक नवरात्र उत्सवात माझे उपवास सुरू आहेत. या प्रकरणी माझे छत्रपती घराण्यातील कोणाशीही बोलणे झालेले नाही. मी लवकरच त्यांची भेट घेऊन त्यांचा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे.

– महंत सुधीरदास पुजारी (काळाराम मंदिर पुजारी)

हेही वाचा : 

The post संयोगीताराजे यांच्या पोस्टवर महंत सुधीरदास यांचा खुलासा; म्हणाले, संकल्प मंत्रामुळे गैरसमज appeared first on पुढारी.