सरकार बदललं आहे, नाशिक देखील बदललेलं पाहायला मिळेल : मुख्यमंत्री

नाशिक : पुढारी ऑनलाइन 

151 वर्ष नाशिकला पूर्ण होत आहे. राज्यातील महत्वाचे शहर म्हणून नाशिकची ओळख आहे. प्रभू रामचंद्रांच्या, संताच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. नाशिक हे पवित्र तिर्थक्षेत्र आहेच त्यासोबतच अनेक गडकिल्ले नाशिकमध्ये आहेत. स्वराज्य रक्षणासाठी महत्वाचे केंद्रबिंदू म्हणून नाशिकचे महत्व होते. अशा ऐतिहासिक महत्व राखणा-या नाशिकने गेल्या अऩेक वर्षात आपली मूळं जपत प्रगतीची उंच भरारी घेतली आहे. विविध श्रेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे. राज्य शासनही नाशिकच्या विकासासाठी वेगवेगळ्या माध्यमातून मदत करत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

नाशिक येथे झालेल्या नाशिकरत्न पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. मुख्यमंत्री पुढे म्हणाले, नाशिकच्या पर्यटनाला चालना दिली पाहीजे. पर्यटनाचा वेग मंदावला आहे, त्याला गती मिळाली पाहीजे. आम्ही देखील तीन महिन्यापूर्वी बरेच मोठे पर्यटन करुन आलो. सरकार बदललं आहे, नाशिक देखील विकासाच्या माध्यमातून बदललेलं आपल्याला पाहायला मिळेल. आपल्या राज्यातील गडकिल्ले आपली ऐतिहासिक संपत्ती आहे. हे गडकिल्ले जपण्याचे काम आपल्याला करायचे आहे. राज्य सरकारने त्याला प्राधान्य दिले आहे. त्यासाठी एक दुर्ग प्राधिकरण आपण करत असल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले.

नाशिक  शहराला जे वैभव प्राप्त झाले ते आपल्याला जपायचे आहे.  राज्य सरकार त्यासाठी योगदान देईल.  2027 ला नाशिकमध्ये कुंभमेळा होणार आहे. कुंभमेळ्यासाठी गैरसोय होणार नाही यासाठी सरकार दखल घेईल. नगरविकास विभाग माझ्याकडे आहे. नाशिककरांच्या विकासाला प्राधान्य दिले जाईल असे मुख्यमंत्री म्हणाले.

तीन महिन्यात 72 निर्णय आम्ही घेतले. त्यात बळीराजाला केंद्रबिंद मानून सरकार काम करतय. जे निकषात बसत नाही असे नुकसान आम्ही भरुन देत आहोत. चांगले निर्णय घेतोय म्हणून सरकारला लोकमान्यता मिळतेय. राज्यात रोजगार वाढला पाहीजे. तरुण स्वत:च्या पायावर उभे करण्याचे प्रयत्न आपण करत आहोत. सरकार सर्वसमावेशक काम करत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

The post सरकार बदललं आहे, नाशिक देखील बदललेलं पाहायला मिळेल : मुख्यमंत्री appeared first on पुढारी.