सरळसेवा : ‘आरोग्य’च्या भरती परीक्षेचे सुधारित वेळापत्रक घोषित

आरोग्य विज्ञान विद्यापीठ www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या आस्थापनेवरील गट ‘ब’, ‘क’ आणि ‘ड’ संवर्गातील रिक्त शिक्षकेतर पदे सरळसेवेने भरण्यात येणार आहेत. भरतीप्रक्रियेसाठी १४, १५ व १७ ऑक्टोबरला लेखी परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. मात्र, या परीक्षांमधील काही पदांसाठीच्या परीक्षा वेळापत्रकात अंशतः बदल करण्यात आला आहे. विद्यापीठाच्या www.muhs.ac.in या संकेतस्थळावर नवीन वेळापत्रक घोषित केल्याची माहिती विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू यांनी दिली.

विद्यापीठ भरतीप्रक्रियेत विविध पदांसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर, लातूर, कोल्हापूर व नाशिक येथील निर्देशित केलेल्या परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार आहे. येत्या १४ तारखेला सकाळी १० ते दुपारी 12 वेळेत लिपिक कम टंकलेखक, डेटा इंट्री ऑपरेटर, रोखपाल, भांडारपाल या पदांसाठी तसेच दुपारी २ ते ४ वेळेत कक्ष अधिकारी, कक्ष अधिकारी (खरेदी), अधीक्षक पदासाठी आणि सायंकाळी ५ ते ६.१५ या कालावधीत शिपाई पदासाठी लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. तसेच १५ ऑक्टोबरला सकाळी १० ते दुपारी १२ यावेळेत वरिष्ठ लिपिक कम डेटा इंट्री ऑपरेटर पदासाठी तसेच दुपारी २ ते ४ वेळेत वरिष्ठ सहायक पदासाठी आणि सायंकाळी ५ ते ६.१५ वेळेत वाहनचालक पदाकरिता लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. दरम्यान, १७ ऑक्टोबर रोजी नाशिक येथे सकाळी 10 ते दुपारी 12 वेळेत सहायक लेखापाल, वीजतंत्री पदांसाठी तसेच दुपारी १ ते २.३० वेळेत निम्नश्रेणी व उच्चश्रेणी लघुलेखक, लघुटंकलेखक, छायाचित्रकार, आर्टिस्ट कम ऑडिओ ॲण्ड व्हिडिओ एक्स्पर्ट या पदांसाठी आणि दुपारी ३.३० ते ५.३० वेळेत सांख्यिकी सहायक पदासाठी आणि दुपारी ३.३० ते सायंकाळी ५ वेळेत विद्युत पर्यवेक्षक पदासाठी लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. सर्व अर्जदारांनी परीक्षा वेळेतील बदलाबाबत नोंद घ्यावी, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा:

The post सरळसेवा : ‘आरोग्य’च्या भरती परीक्षेचे सुधारित वेळापत्रक घोषित appeared first on पुढारी.