सरळसेवा कोटा पदे : जिल्हा परिषदेच्या 2,726 जागा रिक्त

जिल्हा परिषद नाशिक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सरळसेवा कोट्यातील पदे भरण्याबाबत जिल्हा परिषदेने रिक्त जागांचा अंतिम आराखडा राज्य शासनाकडे पाठवला असून, येत्या काळात होणार्‍या भरतीमध्ये यांचादेखील समावेश असण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत जिल्हा परिषदेमध्ये 2,726 जागा रिक्त आहेत. यामध्ये 2,538 जागा या वर्ग 3 च्या आहेत तर 188 जागा या वर्ग 4 च्या आहेत.

राज्य शासनाकडून कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर 4 मे 2020 च्या शासन निर्णयान्वये राज्यात भरतीप्रकिया बंद करण्यात आली. मात्र, आता सर्व सुरळीत होत असताना आणि स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात अंदाजे 75 हजार सरळसेवा कोट्यातील पदे शासन भरणार आहे. ही पदे भरण्याचे उद्दिष्ट साध्य करणे शक्य होण्यासाठी केवळ स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षातील पदभरतीसाठी निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. याबाबत 31 ऑक्टोबर रोजी शासन निर्णयदेखील पारीत करण्यात आला आहे. शासन निर्णयानुसार सुधारित आकृतिबंध अंतिम केलेल्या विभाग कार्यालयांना सरळसेवेच्या कोट्यातील रिक्तपदे 100 टक्के भरण्यास, तर सुधारित आकृतिबंध अंतिम न केलेल्या विभाग, कार्यालयांना गट अ, ब, क संवर्गातील सरळसेवेच्या कोट्यातील रिक्तपदे 80 टक्क्यांपर्यंत भरण्यास मुभा देण्यात आली. मात्र, या निर्बंधातील शिथिलता केवळ 15 ऑगस्ट 2023 पर्यंतच लागू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यापुढील भरतीप्रक्रिया अर्थ विभागाच्या 30 सप्टेंबर 2022च्या शासन निर्णयाप्रमाणे करण्यात येईल. दरम्यानच्या कालावधीत सुधारित आकृतिबंध अद्याप मंजूर करून न घेतलेल्या प्रशासकीय विभागांनी त्यांचा व त्यांच्या अखत्यारित येणार्‍या कार्यालयातील पदांचा आढावा घेऊन उच्चस्तरीय समितीच्या मान्यतेने सुधारित आकृतिबंध अंतिम मंजूर करण्याची कार्यवाही तत्परतेने पूर्ण करावी, असे अर्थ विभागाने स्पष्ट केले असल्याचीदेखील माहिती समोर आली आहे.

75,000 पदे शासन भरणार
2,726 जागा नाशिकमध्ये रिक्त
2,538 जागा वर्ग-3 करीता
188 जागा वर्ग -4करीता

हेही वाचा:

The post सरळसेवा कोटा पदे : जिल्हा परिषदेच्या 2,726 जागा रिक्त appeared first on पुढारी.