सामाजिक दातृत्व : दिव्यांगांसाठी आजीची मायेची ऊब

दिंडोरी आजी www.pudhari.news

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा

तालुक्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांना उषाताई देशपांडे या आजीबाईंच्या मायेची ऊब मिळाली आहे. उषाताईंनी स्वत: विणलेले 30 स्वेटर्स 30 विद्यार्थ्यांना मोफत देत आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यात सामाजिक सत्कर्म करता येते, याचे उत्तम उदाहरण समाजापुढे ठेवले आहे.

दिंडोरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नीलेश पाटील, गटशिक्षणाधिकारी भास्कर कनोज यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समितीच्या सभागृहामध्ये आयोजित कार्यक्रमात दिव्यांग विद्यार्थ्यांनी आजीबाईंचे प्रेम अनुभवले. दिव्यांग विद्यार्थ्यांना काहीतरी मदत केली पाहिजे, ही भावना उषाताईंच्या मनात होती. दिव्यांग विद्यार्थ्यांना आपल्या मदतीतून दररोजची गरज भागली पाहिजे, ही भावना त्यात होती. नाशिकला हिवाळ्यात कडाक्याची पडणारी थंडी लक्षात घेत त्यांनी चक्क 30 स्वेटर्स विणण्याची महत्त्वाकांक्षी योजना आखली आणि वयाचा विचार न करता, जिद्दीने स्वेटर्स विणले. निळ्या रंगातील हे स्वेटर्स मुला-मुलींना उत्तम बसले. फिटिंगनुसार आजीबाईंनी शिवलेले हे स्वेटर्स दिव्यांग विद्यार्थ्यांना भावले आणि त्यांच्या चेहऱ्यावर नवीन गिफ्ट मिळाल्याचे समाधान उमटले. गेल्या चार ते पाच महिन्यांपासून आजींचे हे कार्य सुरू होते. ते त्यांनी जिद्दीने तडीस नेले आणि येत्या हिवाळ्यात दिव्यांग विद्यार्थ्यांना खरोखरच आजीबाईंच्या मायेची ऊब मिळणार आहे. स्वेटर वाटपाच्या सोहळ्यास सहायक गटविकास अधिकारी डी. सी. साबळे, कक्ष अधिकारी महेश काटकर, कनिष्ठ प्रशासन अधिकारी नितीन दळवी, शिक्षण विस्तार अधिकारी के. पी. सोनार, सी. बी. गवळी, सुनीता आहिरे, विजय देवळालकर, उषाताई देशपांडे, श्यामली देशपांडे, अतुल देशपांडे, जिल्हा सक्षमीकरण समन्वयक विजया अवचार, वनिता मंडलिक आदी उपस्थित होते. या सर्वांनी उषाताईंचे कौतुक केले.

हेही वाचा:

The post सामाजिक दातृत्व : दिव्यांगांसाठी आजीची मायेची ऊब appeared first on पुढारी.