सावधान! आज रात्री तुमचा वीजपुरवठा खंडित होणार, विद्युत मंडळाच्या नावे ग्राहकांना फेक मॅसेज

वीज पुरवठा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

ऑनलाइन फसवणुकीचे बहुतांश फंडे लोकांना कळून चुकल्याने भामट्यांकडून आता नवनवीन क्लृप्त्या शोधल्या जात आहेत. आता असाच बनवेगिरीचा नवा अध्याय समोर येत असून, थेट विद्युत मंत्रालयाच्या नावाचे बनावट पत्र नागरिकांना व्हॉट्सॲपवर पाठवून या महिन्याचे वीजबिल भरले नसल्याने, आज रात्री तुमच्या घरातील वीजपुरवठा खंडित केला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच पत्रात मोबाइल क्रमांकही नमूद केला असून, यावर तत्काळ संपर्क साधून वीजबिल भरावे, अशी बतावणी केली जात आहे. सध्या अशा प्रकारचे पत्र अनेकांच्या व्हॉट्सॲपवर धडकले असून, तुम्हालाही असे पत्र आले असेल तर सावधान…

विद्युत मंत्रालयाच्या नावे असलेल्या या पत्रात नागरिकांना खात्री पटावी म्हणून मंत्रालयाचा लोगो दिसत असून, ‘भारतीय राजमुद्रा, आझादी का अमृत महोत्सव, जी-२०, स्वच्छ भारत’ आदी भारत सरकारच्या उपक्रमांकाचे लोगोही दिसून येतात. पत्राच्या सुरुवातीलाच आज रात्री ९ वाजता तुमच्या घरातील वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे. कारण मागील महिन्याचे वीजबिल तुम्ही भरले नसून, अधिक माहितीसाठी महावितरणचे अधिकारी ‘दिवेश जोशी’ यांच्याशी संपर्क साधा असे नमूद केले आहे. तसेच या संदर्भात पत्रात दिलेल्या हेल्पलाइन क्रमांकावर तत्काळ संपर्क साधावा, असे आवाहनही केले आहे. ग्राहकांना पत्राची विश्वासार्हता पटावी म्हणून मुख्य विद्युत अधिकाऱ्याचे हस्ताक्षर आणि शिक्काही ठळकपणे दिसून येतो. अर्थात ही सर्व माहिती बनावट असून, नागरिकांची फसवणूक करण्याचा हा नवा प्रकार आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून अनेकांच्या व्हॉट्सॲप तसेच ई-मेलवर हे पत्र झळकल्याने त्यातील काही जण यास बळी पडल्याचेही समोर येत आहे. कारण या क्रमांकावर संपर्क साधल्यास, संबंधित व्यक्तीला त्याचा ग्राहक क्रमांक विचारला जातो. त्यानंतर एटीएम कार्डवरील क्रमांक अथवा फोन पे, गुगल पे करण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे नागरिकांनी अशा प्रकारच्या बनावट पत्रापासून सावध राहावे, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.

महावितरणचे आवाहन…

अशा प्रकारचे कोणतेही व्हॉट्सॲप मेसेज किंवा एसएमएस महावितरणकडून पाठविण्यात येत नाहीत. त्यामुळे ग्राहकांनी अशा प्रकारच्या मेसेजेसला अजिबात प्रतिसाद देऊ नये. वेगवगेळ्या वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून हे मेसेज किंवा काॅल येत असल्याने, नागरिकांनी त्यास प्रतिसाद देऊ नये. बिल भरण्यासाठी वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून एखादी लिंक पाठविण्यात आली असेल तर संपूर्णपणे दुर्लक्ष करावे अन्यथा आर्थिक फसवणूक होईल, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

महावितरणचा तेव्हाच मेसेज

देखभाल, दुरुस्ती, तांत्रिक कारणांमुळे वीजपुरवठा खंडित होत असेल अन् ताे पूर्ववत होण्यास लागणारा संभाव्य कालावधी कळविण्यासाठी महावितरणकडून ग्राहकांना एसएमएस पाठविले जाण्याची शक्यता असते. तसेच दरमहा वीजबिलांची रक्कम, स्वत:हून मीटर रीडिंग पाठविण्याचे ग्राहकांना आवाहन, मिटर रीडिंग घेतल्याची तारीख, वापर केलेले एकूण युनिट संख्या, वीजबिलाची रक्कम आदींबाबतचे मेसेज येतात. हे सर्व मेसेज महावितरणच्या अधिकृत नावाचे क्रमांकावरूनच पाठविले जातात. वैयक्तिक मोबाइल क्रमांकावरून कोणताही मेसेज पाठविला जात नाही.

फसवणूक टळली

नाशिकमधील एका ग्राहकाला हे पत्र प्राप्त झाल्यानंतर त्याने दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधला. तेव्हा त्याने बँकेशी संबंधित काही माहिती विचारली. शंका आल्यानंतर तत्काळ फोन केला. महावितरणच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून त्या पत्राची खातरजमा केली असता, ते फेक असल्याचे समजले. बँकेची माहिती दिली असती तर आर्थिक फसवणूक झाली असती.

हेही वाचा :

The post सावधान! आज रात्री तुमचा वीजपुरवठा खंडित होणार, विद्युत मंडळाच्या नावे ग्राहकांना फेक मॅसेज appeared first on पुढारी.