Site icon

सावधान! कसारा घाटातील रस्ता खचतोय, महामार्गाला गेले मोठे तडे

इगतपुरी, (नाशिक) पुढारी वृत्तसेवा : मुंबई-आग्रा महामार्गावरील कसारा घाटासह पडघा ते गोंदे दरम्यान महामार्गावर मोठ्या खड्यांना चुकवत वाहन चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. त्यातच आता कसारा घाटातील रस्ताच खचत चालला असून महामार्गांवर काही अंतरावरील रस्त्याला पूर्णता: तडे गेले असून रस्ता दबला गेला आहे. त्यातच रस्त्याच्या कडेला असलेले संरक्षक कठडे देखील रस्ता सोडून बाजूला सरकले आहेत. मुबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग असलेल्या महामार्गावरील मुंबई-नाशिक दरम्यानच्या जुन्या कसारा घाटाची निकृष्ट दर्जाची झालेली कामे व पडणाऱ्या पावसामुळे कसारा घाटाची पुरती वाट लागल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे.

अति महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या कसारा घाटात वर्ष २०२० च्या पावसाळ्यात कसारा जुना घाट व नवीन घाटातील दोन्ही मार्गिकेवर मोठ्या प्रमाणात रस्ता खचला होता. परिणामी काही दिवस महामार्गावरिल वाहतूक एकेरी मार्गाने सुरु ठेवण्यात आली होती. यानंतर पावसाळा संपल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व टोलप्लाझा कंपनीने एका ठेकेदारा करवी कोट्यवधी रुपये खर्चून तडा गेलेला रस्ता व खचलेल्या भागाची दुरुस्ती करून घेतली. परंतु हे काम निकृष्ट झाल्याची चर्चा सुरू होती. त्यातच यंदा आठवड्याभराच्या पावसामुळे दि. १६ जुलै २०२२ रोजी जुन्या कसारा घाटात रस्त्याला मोठे तडे गेल्याचे समोर आले. विशेष म्हणजे मागील वर्षी ज्या ठिकाणी रस्त्याला तडे गेले होते व खचले होते त्याच ठिकाणी रस्त्याला अर्धा किमी मीटरपर्यंत अनेक ठिकाणी रस्त्याला तडे गेले आहेत.

शिवाय रस्त्याच्या कडेला सुरक्षिततेसाठी बांधण्यात आलेले संरक्षण कठडे सुद्धा एक ते दीड फुट खाली दबले गेले आहेत. तर काही कठडे पडले आहेत. दरम्यान जुन्या कसारा घाटातील रस्यावरील तडे मोठ्या प्रमाणात वाढत असून घाटातून जाणाऱ्या अवजड वाहनांमुळे तर आणखीनच रस्त्या खचण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी तडा गेलेल्या व खचलेल्या रस्त्यावर उपाययोजना करून एक किमी रस्त्यावर एकेरीच वाहतूक सुरु ठेवणे गरजेचे आहे अन्यथा दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येणार नाही, असे प्रवाशांचे म्हणणे आहे.

तडा गेलेल्या रस्त्यात पाणी जाऊन भरावं खाचण्याची शक्यता

जुन्या कसारा घाटात रहदारी मोठ्या प्रमाणात असते. त्यातच अर्धा किमी मीटरचा रस्ता खचला आहे. अनेक मोठ्या भेगा या रस्त्यावर पडल्या आहेत. दरम्यान पावसाचे पाणी रस्त्यावर पडलेल्या भेगा व तडे यात जात असून यामुळे भराव खचण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे. त्यातच तुटलेले संरक्षक कठडे, रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे प्रवाशांच्या जीवावर बेतत आहे.

मुंबई-नाशिक महामार्गावरील वडपे ते गोंदे या दरम्यान रस्त्याची चाळण झाली आहे. या खड्यांमुळे अनेक अपघात रोज होत आहेत. कसारा घाटात खड्यांची रांगोळीच निर्माण झाली आहे. पण कसारा घाटाच्या नागमोडी वळणावर व खोल दरीत वाहने पडण्यापासून संरक्षण व्हावे यासाठी असलेले संरक्षण कठडे पूर्णता: तुटून गेलेले आहेत. त्यामुळे मुंबई-नाशिक हा टोल रस्ता प्रवाशांच्या जीवावरच उठला आहे.
– शाम धुमाळ, अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन टीम, कसारा

The post सावधान! कसारा घाटातील रस्ता खचतोय, महामार्गाला गेले मोठे तडे appeared first on पुढारी.

Exit mobile version