सावानातील पुस्तकांची दुनिया

सावाना www.pudhari.news

नाशिक : दीपिका वाघ

सार्वजनिक वाचनालयातील वाचक सभासदांना व्हॉट्सअ‍ॅप तसेच एसएमएसद्वारे पुस्तकांची उपलब्धता त्यानंतर पोथ्यांचे डिजिटायझेशन, पुस्तकांचे आरक्षण, घरपोच सेवा यांसारख्या सुविधा आगामी काळात सभासदांना मिळणार आहेत. 1840 साली स्थापन झालेली सार्वजनिक वाचनालय संस्था ही शहरातील सर्वात श्रेष्ठ अशी संस्था आहे. 1885 साली 65 सभासद संख्येपासून सुरू झालेला प्रवास 2023 मध्ये 12 हजार 980 पर्यंत पोहोचला आहे. सार्वजनिक वाचनालयात दर महिन्याला वाचकांच्या मागणीनुसार, तर काही सावानाच्या वतीने पुस्तकांची निवड करून खरेदी केली जाते. पुस्तक प्रतींची मागणी किती त्यानुसार पुस्तक सावाना आणि गंगापूर रोड येथील वाचनालयासाठी घेतली जातात. शहरात पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम किंवा नवीन लेखक शहरात आले असतील आणि त्यांचे पुस्तक वाचनालयात नसेल, तर अशी पुस्तके ताबडबोब खरेदी केली जातात. काही वेळा पुस्तकांच्या रूपाने वाचनालयाला देणगी मिळत असते. पण, नेहमी त्या पुस्तकांची मागणी असतेच असे होत नाही. साधारणपणे वाचनालयात महिन्याला 40 ते 50 हजार, तर कधी 20 ते 30 रुपयांपर्यंत पुस्तकांची खरेदी केली जाते. विविध प्रकाशक संस्थांकडून पुस्तके सावानात पाठविली जातात, तर काही लेखक त्यांची पुस्तके स्वत: स्वखुशीने वाचनालयात आणून देतात. शंकराचार्य न्यासाच्या वतीने 10 कपाटे गॅझेटची पुस्तके वाचनालयाला भेट म्हणून दिली आहेत, तर लेखक दिगंबर गाडगीळ यांनीही निसर्गाशी संबंधित असणारी पुस्तके भेट दिली आहेत. येत्या काळात लोकांना अवाहन करून जन्मदिनाच्या दिवशी किंवा आप्तांच्या आठवणीप्रसंगी लोकांना पुस्तक भेट म्हणून वाचनालयाला देता येणार असल्याची सावानाची आगामी योजना असणार आहे. सध्या पोथ्यांच्या डिजिटायझेशन प्रक्रियेला सुरुवात झाली असून, पोथ्यांचे लाखो पाने वर्गीकरण करण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे वाचकांना ई-बुक्सच्या रूपात दुर्मीळ ग्रंथसंपदा, पोथ्या, साहित्य वाचायला मिळणार आहे.

ग्रंथसंपदा पुढीलप्रमाणे…
देवघेव विभाग : 92 हजार 404, संदर्भ विभाग : 43 हजार 734, बाल विभाग : 4 हजार 681, दुर्मीळ विभाग : 2 हजार 47, अतिदुर्मीळ विभाग : 1 हजार 237
भाषानिहाय पुस्तकांची संख्या
मराठी : 1 लाख 12 हजार 992, इंग्रजी : 25 हजार 886, हिंदी : 5 हजार 137.
विषयनिहाय पुस्तके
कादंबरी : 17 हजार 797, कथासंग्रह : 11 हजार 920, चरित्र : 11 हजार 795, निबंध लेख संग्रह : 7 हजार 763, कविता : 7 हजार 757, नॉवेल : 7 हजार 59, शास्त्रीय : 6 हजार 425, तत्त्वज्ञान : 5 हजार 613, नाटक : 5 हजार 377, जनरल : 4 हजार 83, इतिहास : 3 हजार 428, टीका : 3 हजार 76, उपन्यास : 2 हजार 670, समाजशास्त्र : 2 हजार 558, आर्ट अ‍ॅण्ड सायन्स : 2 हजार 492, बायोग्राफी : 2 हजार 359, धार्मिक :
2 हजार 301, फिलोसॉफी : 2 हजार 218, संस्कृत :
2 हजार 164.

The post सावानातील पुस्तकांची दुनिया appeared first on पुढारी.