साहित्य संमेलने लोकवर्गणीतूनच व्हावीत : लक्ष्मीकांत देशमुख

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा
साहित्य संमेलनांचे आयोजन लोकवर्गणीतूनच केले पाहिजे, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष तथा सेवानिवृत्त जिल्हाधिकारी सुप्रसिद्ध लेखक लक्ष्मीकांत देशमुख यांनी नाशिक येथे आयोजित एकदिवसीय राज्यस्तरीय 19व्या सूर्योदय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना केले.

पाथर्डी फाटा नाशिक येथील मानवधन विद्यानगरीत हे संमेलन झाले. व्यासपीठावर स्वागताध्यक्ष डॉ. प्रकाश कोल्हे, सूर्योदय संमेलनाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध लेखिका माया धुप्पड, सुप्रसिद्ध लेखक प्रा. डॉ. सतीश बडवे, माजी जिल्हाधिकारी बी. जी. वाघ, प्रा. डॉ. यशवंतराव पाटील, नाशिक सूर्योदयचे जिल्हाध्यक्ष सावळीराम तिदमे, शहराध्यक्ष जनार्दन माळी, मंडळाचे अध्यक्ष सतीश जैन उपस्थित होते. मंडळाचे अध्यक्ष सतीश जैन यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात दिला जाणारा निधी बंद करावा व महाराष्ट्र साहित्य सांस्कृतिक मंडळानेही दोन लाखांचा निधी देताना विचार करावा, अशी मागणी केली. तसेच लेखकांनी मोठे रकमेचे मानधन सोडून साहित्य चळवळीतील मंडळाच्या कार्यक्रमांना उपस्थिती दिली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले की, उर्दू भाषा आपल्या भारताची आहे. पूर्वी दिग्गज लेखकांनी आपले साहित्य उर्दूत लिहिले. मग हिंदीत त्याचे अनेक दाखले त्यांनी दिले. शासकीय अनुदान जे आहे ते तर नियमानुसार मिळणारच आहे. परंतु लोकवर्गणीतून साहित्य संमेलने झाली पाहिजे, अशी छोटी साहित्य संमेलने खूप महत्त्वाची असल्याचेही त्यांनी नमूद केले. श्री. दलुभाऊ जैन चॅरिटेबल ट्रस्ट प्रायोजित अखिल भारतीय श्री. दलुभाऊ जैन सूर्योदय मराठी साहित्य भूषण पुरस्कार सुप्रसिद्ध लेखक बाबा भांड यांना देण्यात आला. 21 हजार रुपये आणि गौरवपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. स्व. सौ. कांताबाई भवरलाल जैन यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा सूर्योदय सेवारत्न पुरस्काराने डॉ. छाया महाजन यांना देण्यात आला. 11 हजार रुपये आणि गौरवपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. सौ. लीलाबाई दलिचंद जैन बालसाहित्य पुरस्कार वर्षा चौगुले (सांगली) यांना देण्यात आला. पाच हजार रुपये आणि गौरवपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. स्व. कांतीलाल मोरे यांच्या स्मरणार्थ सूर्योदय शब्दरत्न पुरस्कार प्रा. डॉ. प्रमोद पडवळ (वाराणसी) यांना देण्यात आला. रुपये पाच हजार व गौरवपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

हेही वाचा:

The post साहित्य संमेलने लोकवर्गणीतूनच व्हावीत : लक्ष्मीकांत देशमुख appeared first on पुढारी.