सिंहस्थ कुंभमेळा – 2027 : प्राधिकरणासाठी शैव आखाड्यांचा पाठपुरावा

कुंभमेळा नाशिक
नाशिक (त्र्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा
गोदावरीचे उगमस्थान असलेले त्र्यंबकेश्वर हे सिंहस्थ कुंभमेळ्याचे प्रमुख स्थान असल्याचे भारत सरकारच्या राजपत्रात घोषित करावे तसेच कुंभमेळा प्राधिकरणाच्या स्थापनेसाठी पाठपुरावा सुरू केला आहे, अशी माहिती आखाडा परिषदेचे महामंत्री हरिगिरी महाराज आणि पुरोहित संघाचे अध्यक्ष मनोज थेटे यांनी दिली.
निलपर्वतावरील जुना पंचदशनाम आखाडा येथे हरिगिरी महाराज यांचे आगमन झाले आहे. मनोज थेटे यांच्यासोबत तीर्थक्षेत्राच्या प्रश्नांबाबत बैठक झाली. सिंहस्थ कुंभमेळा पूर्वीपासून त्र्यंबकेश्वर येथे कुशावर्तावर होत होता. शैव आणि वैष्णव आखाडे सर्व येथे स्नान करायचे. आजही वैष्णव आखाड्यांच्या शाही स्नानांसाठी येथे वेळ राखीव असतो. मात्र, नाशिकला रामघाटावर केवळ वैष्णव आखाडे स्नान करतात. त्र्यंबकेश्वर येथेच शेकडो वर्षांपासून सिंहस्थ कुंभमेळा भरतो, असे शासनाने राजपत्रात जाहीर करण्यासाठी पुरावे जमा करणे, न्यायालयीन लढाई लढणे यासाठी सर्व 10 शैव आखाड्यांचे साधू तसेच पुरोहित संघाने एकत्र लढा देण्याचा निर्धार करण्यात आला. यावेळी साधू, महंत तसेच आखाड्यांचे पुरोहित त्रिविक्रम जोशी उपस्थित होते.
खासदार हेमंत गोडसे यांच्यावर पाठपुराव्याची जबाबदारी
जुना आखाडा निलपर्वत येथे खा. हेमंत गोडसे यांच्यासोबत महंत हरिगिरी महाराजांची कुंभमेळा नियोजनाबाबत विस्तृत चर्चा झाली. गोदावरीस बारमाही पाणी राहील, त्र्यंबकेश्वर रेल्वेबाबत पाठपुरावा करणे आदी विषयांवरही चर्चा झाली. यावेळी थेटे यांनी कुंभमेळा मंत्रालय अथवा प्राधिकरण स्थापन करण्याची मागणी केली. खासदार गोडसे यांनी संसद स्तरावर तसेच मुख्यमंत्री महोदयांकडे याबाबत चर्चा करणार असल्याचे सांगितले.
पुरोहित संघाचे संकल्प असे…
त्र्यंबकेश्वर येथे विस्तीर्ण आकाराचे निवारागृह बांधणे.
भाविकांना मोफत महाप्रसादाची व्यवस्था करणे.
भगवान परशुराम यांची 108 फूट मूर्तीची स्थापना करणे.

हेही वाचा:

The post सिंहस्थ कुंभमेळा - 2027 : प्राधिकरणासाठी शैव आखाड्यांचा पाठपुरावा appeared first on पुढारी.