सीईओंच्या कार्यशैलीला अधिकाऱ्यांचे गतिरोधक

झेडपी आशिमा मित्तल www.pudhari.news

मिनी मंत्रालयातून : वैभव कातकडे

कोणत्याही शासकीय संस्थेत नवीन अधिकारी आल्यानंतर पहिल्या दोन महिन्यांत आपल्या कामातून छाप पाडत असतो. त्याला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल याही अपवाद नाहीत. ऑक्टोबरमध्ये त्यांनी जिल्हा परिषदेची सूत्रे हाती घेतल्यानंतर अनेक नावीन्यपूर्ण योजनांना मूर्तरूप देण्याचा प्रयत्न केला. नवीन सीईओ असल्याने त्या समजून जरी घेत असल्या, तरी प्रशासनात येण्यापूर्वी त्या उच्चशिक्षित आयआयटीयन आहेत. त्यामुळे मिनी मंत्रालयाला त्या प्रोफेशनल स्वरूप देण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, आता जि.प.तील विभागप्रमुखांच्या बदल्यांचे वारे वाहू लागल्याने सीईओंच्या वेगवान कार्यशैलीला अधिकार्‍यांमुळे गतिरोधक लागले आहेत.

गेल्या आठवड्यात मुख्य कार्यकारी अधिकारी मित्तल यांनी घेतलेल्या विभागप्रमुखांच्या आढावा बैठकीत याचा प्रत्यंतर आला. यात काही विभागप्रमुख हे उशिरा दाखल झाले. काही विभागप्रमुखांनी फाइल आणल्या नाहीत, तर कोणी आपल्या प्रतिनिधींना पाठविले होते. कोणाला विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देता आली नाहीत, तर कोणी आपण आताच बदली होऊन आलो असल्याचे सांगितले, अशी उत्तरे दिली गेल्याने मित्तल यांनी बैठकीत अधिकार्‍यांना चांगलेच खडेबोल सुनावले. जिल्ह्यातील विकासकामांबाबत पालकमंत्री दादा भुसे यांनी स्थगिती उठविल्यानंतर तो निधी विहित वेळेत खर्च होण्यासाठी निधी नियोजन करणे आवश्यक असताना, विभागप्रमुखांकडून अशी उत्तरे अपेक्षित नाहीत. यापूर्वी गेल्या महिन्यात पालकमंत्र्यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत अनेक विभागप्रमुखांनी, व्यवस्थित माहिती नाही. ज्यांनी दिली त्यांनी अर्धीच माहिती उपलब्ध असल्याचे सांगितले. या सर्व प्रकारांमुळे कधीही संतप्त न होणार्‍या पालकमंत्र्यांनी काही अधिकार्‍यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचे आदेश देत कारवाईदेखील केली होती. तरीही अधिकार्‍यांच्या कार्यप्रणालीत कोणतीही सुधारणा झालेली नसल्याचे विभागप्रमुखांच्या बैठकीत दिसून आले. वास्तविक विचार केल्यास जि.प.च्या अनेक अधिकार्‍यांना आता बदलीचे वेध लागले आहेत. त्यामुळे हे विभागप्रमुख सोयीच्या ठिकाणी बदलीच्या प्रयत्नांत आहेत. परिणामी, त्यांच्या कामात शिथिलता येत आहे. मात्र, मुख्य कार्यकारी अधिकारी मित्तल यांची कार्यशैली कामांचा निपटारा लवकर व्हायला हवा, अशी आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अधिकारी यांच्या या परस्परविरोधी बाबी आहेत. त्यामुळे सीईओंना कामाबाबत जे अपेक्षित होते, त्याबाबत अधिकार्‍यांमध्ये प्रचंड उदासीनता दिसून येत आहे. याचेच समर्पक उदाहरण म्हणजे ‘सुपर 50’ बाबत झालेली दिरंगाई होय. जि. प. मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा कार्यभार घेऊन मित्तल यांना दोन महिने झाले. त्यांनी पहिल्याच आठवड्यात या महत्त्वाकांक्षी उपक्रमाची सुरुवात केली. मात्र, प्रशासनाने त्याबाबत इतकी दिरंगाई दाखविल्याने माध्यमिक शिक्षणाधिकार्‍यांना कामात दिरंगाई केल्याबाबत नोटीस बजाविण्यात आली.

मिनी मंत्रालयात प्रशासकीय राज
सध्या जि.प.मध्ये प्रशासकीयराज सुरू आहे. पदाधिकार्‍यांची टर्म संपल्याने आणि निवडणुका नसल्याने फक्त प्रशासनच सारे निर्णय घेत आहे. अधिकार्‍यांकडून योग्य पद्धतीने कामे करून घेण्यासाठी पदाधिकारी असणे महत्त्वाचे आहेत, हे या ठिकाणी अधोरेखित होत आहे.

हेही वाचा:

The post सीईओंच्या कार्यशैलीला अधिकाऱ्यांचे गतिरोधक appeared first on पुढारी.