सुषमा अंधारे राष्ट्रवादीकडून आलेलं पार्सल : गुलाबराव पाटील

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी धरणगाव येथे प्रबोधन सभा घेऊन शिंदे गटावर चौफेर टीका केली. यातही पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर अंधारे यांनी सडकून टीका केली. यानंतर आता गुलाबराव पाटील यांनी सुषमा अंधारे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

ठाकरे गटाच्या महाप्रबोधन यात्रेबद्दल बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले की, अशा लोकांची महाप्रबोधन यात्रा नसून, हे जे प्रॉडक्ट आलं आहे, ते राष्ट्रवादीचं प्रॉडक्ट आहे. सुषमा अंधारेंना राष्ट्रवादीने शिवसेना संपवण्यासाठी पाठवलं आहे. उरल्या-सुरलेल्या शिवसेनेचं नुकसान करण्यासाठी हे नवीन पार्सल राष्ट्रवादीकडून इकडं आलेलं आहे, अशी टीका पाटील यांनी केली आहे.

 त्यामुळेच नाकारली परवानगी

पुढे बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले की, मुक्ताईनगरला चंद्राकांत पाटील आणि माझी संध्याकाळी सात वाजता सभा होती आणि सुषमा अंधारे यांची देखील सभा होती. जिल्ह्यात १४४ कलम लागू आहे. दोघांच्या सभेची परवानगी नाकारली आहे. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी मला विनंती केली की, आपण जिल्ह्याचे पालकमंत्री आहात आणि कायदा सुव्यवस्था सांभाळणं, आपली जबाबदारी आहे. म्हणून आम्ही परवानगी नाकारत आहोत, असे गुलाबराव पाटील म्हणाले.

समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न

गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, कोणी आमच्या समाजावर बोलून तेढ निर्माण करत असेल, तर पालकमंत्री म्हणून ते थांबवण्याची जबाबदारी माझी आहे. मी प्रशासनाने दिलेल्या सुचनेनुसार सभा घेणार नाही, असा शब्द दिला आहे. त्यामुळे त्यांनी दोघांचीही परवानगी नाकारली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, आज शिंदे गटाचे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्यातर्फे मुक्ताईनगरात गुलाबराव पाटील यांच्यासोबत सभा होती. दरम्यान, सुषमा अंधारे यांची सभा आणि शिंदे गटाचा कार्यक्रमादरम्यान उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते आमने-सामने येण्याची शक्यता होती. दरम्यान कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता पाहता प्रशासनाने दोन्ही कार्यक्रमांना परवानगी नाकारली आहे.

हेही वाचलंत का ? 

The post सुषमा अंधारे राष्ट्रवादीकडून आलेलं पार्सल : गुलाबराव पाटील appeared first on पुढारी.