सेवा पंधरवडा : गांधी जयंतीनिमित्त नाशिक महापालिकेतर्फे स्वच्छता मोहीम

स्वच्छता मोहिम www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गांधी जयंतीनिमित्त नाशिक महानगरपालिकेतर्फे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी तीन टन कचरा संकलित करण्यात आला. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या मार्गदर्शनाखाली 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ हा उपक्रम राबविण्यात आला. या पंधरवड्याची सांगता गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता मोहिमेने करण्यात आली.

पंधरवड्यादरम्यान, 15 दिवसांत आपले सरकार पोर्टल, प्रधानमंत्री पोर्टल, नागरी सेवा पोर्टल व इतर वेबपोर्टलवरील प्रलंबित अर्जांचा जलदगतीने निपटारा करण्यात आला. त्याच अनुषंगाने घनकचरा व्यवस्थापन विभाग संचालक डॉ. आवेश पलोड यांच्या सूचनेनुसार, प्रभाग क्रमांक 24 मधील अण्णा पाटील शाळा चौक ते कुबेर लॉन्स, बडदेनगर या भागात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेंतर्गत परिसरातील रस्ता आणि मोकळे भूखंड येथे साफसफाई करून प्लास्टिक, कागद व इतर सर्व मिळून अंदाजे तीन टन कचरा गोळा करून घंटागाडीमार्फत उचलण्यात आला. यावेळी स्वच्छतेबाबत जनजागृती करून नागरिकांचे प्रबोधनही करण्यात आले. विभागीय अधिकारी मयूर पाटील यांनी सेवा हमी कायद्याबाबत माहिती दिली. या मोहिमेमध्ये सामाजिक कार्यकर्ते चंद्रकिशोर पाटील आणि त्यांचे सहकारी सहभागी झाले होते. तसेच मनपा उपआयुक्त डॉ. विजयकुमार मुंढे, विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय गांगुर्डे यावेळी उपस्थित होते. बांधकाम विभाग, उद्यान विभाग, मलेरिया विभाग, आरोग्य अभियांत्रिकी (मलनि:सारण) विभागातील कर्मचारी तसेच घनकचरा व्यवस्थापन विभागातील सर्व स्वच्छता निरीक्षक, स्वच्छता मुकादम आणि सफाई कर्मचारी या विशेष मोहिमेत सहभागी झाले होते.

हेही वाचा:

The post सेवा पंधरवडा : गांधी जयंतीनिमित्त नाशिक महापालिकेतर्फे स्वच्छता मोहीम appeared first on पुढारी.