स्मार्ट सिटी कंपनीचा मनमानी कारभार कधी थांबणार!

www.pudhari.news

नाशिक : कॅलिडोस्कोप – ज्ञानेश्वर वाघ

केंद्र सरकारने ज्या उद्देशाने स्मार्ट सिटी कंपनीची स्थापना केली तो उद्देश किमान नाशिक शहरापुरता कधीच सफल झाला नाही. गेल्या सात वर्षात या कंपनीने नाशिककरांना वैतागाशिवाय काहीच दिले नाही, असे म्हणण्याची वेळ आली आहे. एकतर या कंपनीत असलेल्या अधिकाऱ्यांना नाशिकच्या जडणघडणीविषयी फारशी माहिती नाही. असे असताना महापालिकेतील स्थानिक अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन कारभार करण्याऐवजी हम करे सो असाच कारभार या कंपनीच्या अधिकाऱ्यांचा राहिलेला आहे. आताही त्याचीच प्रचिती पुन्हा येत आहे. गणेशोत्सवाला काही दिवसांचाच अवधी शिल्लक आहे. यामुळे गणेश मंडळांची सर्वत्र लगभग सुरू आहे. बी. डी. भालेकर मैदानावर गणेशोत्सव मंडळांची आरास हे नाशिक शहराचे वैशिष्ट्यच म्हणावे लागेल. अनेक मोठ मोठ्या कंपन्या तसेच संस्थांकडून उभारले जाणारे देखावे पाहिल्याशिवाय गणेशोत्सव पूर्णच होणार नाही, अशा प्रकारे नाशिककरांची नाळ भालेकर मैदानाशी जुळालेली आहे.

कोरोना महामारीचे विघ्न दूर झाल्याने शिंदे-फडणवीस सरकारने यावर्षी दणक्यात आणि धुमधडाक्यात गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन गणेश मंडळांना केले आहे. त्यामुळे साहजिकच गेल्या दोन वर्षापासून निर्बंधांच्या ओझ्याखाली गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांमध्ये चैतन्य, हुरूप, उत्साह निर्माण झाला आहे. त्याचअनुषंगाने नाशिक महानगर गणेशोत्सव महामंडळाने भालेकर मैदानावरील लोखंडी पाईप उचलून घेण्याबरोबरच त्याठिकाणची स्वच्छता करण्याची मागणी स्मार्ट सिटी कंपनीकडे केली असता या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पाईप तिथेच राहतील, तुम्ही गणेशोत्सव तसाच साजरा करण्याचा अजब सल्ला पदाधिकाऱ्यांना दिला. म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासूनच्या परंपरेचे स्मार्ट सिटी कंपनीच्या अधिकाऱ्यांना काही पडलेले दिसत नसल्याचेच त्यांच्या बोलण्यातून आणि वर्तणुकीत स्पष्ट होते. त्यामुळे हा मनमानी कारभार पहिल्यांदा थांबला पाहिजे. स्मार्ट सिटीमुळे नाशिकमध्ये मोठे वैभव निर्माण झाले अशातला अजिबात प्रकार नाही. महाकवी कालिदास कलामंदिर, महात्मा फुले कलादालन आणि नेहरू उद्यान या तीन ठिकाणचे नुतनीकरण सोडता एकही काम स्मार्ट सिटीला उभे करता आले नाही हे दुदैवाने म्हणावे लागेल. दीड वर्ष मुदत असलेल्या स्मार्ट रोडचे काम जवळपास तीन वर्ष चालले. त्यातही या रस्त्यासाठी सुमारे १० ते १२ कोटी रूपये अधिक मोजावे लागले आहे. स्मार्ट रोडच्या कामाचा दर्जा पाहिल्यास २५ वर्षांपूर्वी काँक्रिटीकरणाचे काम झालेल्या महात्मा गांधी रोडसमोर स्मार्ट रोड कुठेच नाही, हे एखादा सामान्य माणूसही सांगू शकेल. याआधीचे वादग्रस्त ठरलेले मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल यांच्या मनमानी कारभाराचा वारसा पुढे सुमंत माेरे यांनी चालू ठेवला आहे. शासनाच्या पैशांची कशीही उधळपट्टी करण्याचेच धोरण स्मार्ट सिटी कंपनीने आखल्याचे दिसते आहे. थविल यांनी तर सुरूवातीला स्मार्ट सिटीअंतर्गत करण्यात येणाऱ्या कामांसाठी मागविलेल्या निविदा थोड्या थिडक्या नव्हे, तर चक्क ६५ ते ६७ टक्के जादा दराने मंजूर करण्याचा सपाटा लावला होता. त्याविरोधात कंपनीचे संचालक तथा महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी विरोध केल्यानंतर ही बाब समोर आली. अर्थात, या निविदा रद्द करण्याचे पुण्यकर्म तेव्हाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केले. अन्यथा कोट्यवधी रूपयांची उधळपट्टी स्मार्ट कामांवर तेव्हाच झाली असती. आताही थविल यांच्यानंतर त्यांच्या जागी आलेले मोरे यांनीही मनाचाच कारभार सुरू केला आहे. सराफ बाजार, दहिपूल या भागातील रस्ते, ड्रेनेजच्या कामाविषयी तेथील स्थानिक पदाधिाकाऱ्यांनी सूचना देऊनही कंपनीने कामात बदल केला नाही. त्याचे परिणाम सध्या पावसाळ्यात येत आहे. या भागात पाणी तुंबण्याचा प्रकार तर थांबला नाहीच उलट त्यात वाढ झाली आहे.

गाळाऐवजी वाळूचाच उपसा

गोदावरी नदीचे खोलीकरण करण्यासाठी त्यातील गाळ उपसा करण्याचे काम कंपनीने हाती घेतले. त्यासाठी ठेकेदाराची नेमणूक केली. मात्र स्मार्ट कंपनीने आणि ठेकेदाराने संगमनत करून नदीतील गाळ उपसा करण्याबरोबरच वाळूचा उपसा करून त्याची बाहेर बाजारभावाने विक्री करत मोठी माया जमवली. त्या प्रकरणाची जिल्हाधिकारी कार्यालयाकडून चौकशी सुरू आहे. खरे तर स्मार्ट सिटी कंपनीकडून झालेल्या आणि सुरू असलेल्या सर्वच कामांची चौकशी थर्ड पार्टीकडून होणे अपेक्षीत आहे. असे झाल्याशिवाय गलेलठ्ठ पगार घेऊन कार्यालयातच कागदपत्रांवर हात मारणाऱ्यांच्या मनमानीला चाप बसणार नाही हे तितकेच खरे!

हेही वाचा:

The post स्मार्ट सिटी कंपनीचा मनमानी कारभार कधी थांबणार! appeared first on पुढारी.