Site icon

स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) योजना : वर्षअखेर वैयक्तिक शौचालय बांधकाम उद्दिष्टपूर्ती

नाशिक : वैभव कातकाडे
नाशिक जिल्ह्यात 2022-23 या वर्षात वैयक्तिक शौचालय बांधकामाचे 3 हजार 58 एवढे लक्ष्य असून, पहिल्या सहा महिन्यांत 1 हजार 981 जणांना अनुदान वाटप करण्यात आले आहे. वर्षअखेरीस शौचालयांचे 100 टक्के बांधकाम पूर्ण होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ यांनी दिली. यामुळे ग्रामीण भागांची हागणदारीमुक्तीकडे वेगाने वाटचाल सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे.

केंद्र शासनाने ऑनलाइन प्रणालीद्वारेही वैयक्तिक शौचालयासाठी पात्र लाभार्थ्यांना बांधकामासाठी प्रोत्साहन अनुदान देणे सुरू केले असल्याने जिल्ह्यात वार्षिक लक्ष्यामध्ये वाढ होत असल्याचे चित्र आहे. देशात स्वच्छता निर्माण व्हावी यासाठी केंद्र सरकारतर्फे स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत देशात शौचालय बांधकाम करून सन 2019 मध्ये देश हगणदारीमुक्त म्हणून घोषित करण्यात आला आहे. मात्र, त्यानंतरही विभक्त होणारे कुटुंब, वाढली कुटुंबसंख्या तसेच सन 2014 च्या सर्वेक्षणामध्ये सुटलेले कुटुंब या योजनेपासून वंचित राहू नये म्हणून दरवर्षी वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी प्रोत्साहन अनुदान देण्यात येत आहे. राज्यात आज अनेक कुटुंबे दारिद्र्यरेषेखाली आहेत. आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी ते असमर्थ असतात. उघड्यावर शौचास बसल्यास परिसरात दुर्गंधी आणि रोगराईला निमंत्रण दिले जात असते. यावर उपाय म्हणून केंद्र सरकारने शौचालय अनुदान योजना सुरू केली आहे. यामध्ये दारिद्र्यरेषेखालील सर्व कुटुंबांना तर दारिद्र्यरेषेवरील अपंग, अल्पभूधारक, स्त्री कुटुंबप्रमुख, शेतमजूर, एस. सी. व एस. टी. कुटुंब यांना प्रोत्साहन अनुदान देण्यात येते. शौचालय अनुदान योजनेअंतर्गत राज्यातील गरीब तसेच आर्थिकद़ृष्ट्या कमजोर कुटुंबे जे वैयक्तिक शौचालय बांधण्यास इच्छुक आहेत, परंतु आर्थिक स्थिती कमजोर असल्यामुळे ते वैयक्तिक शौचालय बांधण्यास असमर्थ असतात. या योजनेतील मदतीमुळे दिलासा मिळत आहे.

लाभार्थ्यांना मिळणारे अनुदान असे….
कुटुंबांना वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी 12 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येते. शौचालय अनुदान योजना केंद्र आणि राज्य सरकारच्या विद्यमाने राबविण्यात येते. यात केंद्र सरकारचा 75 टक्के म्हणजेच 9000 रुपये आणि राज्य शासनाचा 25 टक्के म्हणजेच 3000 रुपये वाटा असतो. शौचालय अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक व्यक्तींनी ग्रामपंचायतीमार्फत किंवा ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

योजनेची अंमलबजावणी व्यवस्थित सुरू आहे. डिसेंबरपर्यंत आपण लक्ष्य पूर्ण करू. निर्धारित कालावधीच्या आधीच आपले लक्ष्य पूर्ण होत आहे. ऑनलाइन येणार्‍या अर्जांचीदेखील छाननी पूर्ण होऊन लाभ दिला जात आहे. – वर्षा फडोळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

घरबसल्या करा अर्ज…
या योजनेअंतर्गत अर्ज करून सर्व जाती-धर्माच्या व्यक्ती लाभ घेऊ शकतात. स्वच्छ भारत मिशनला प्रोत्साहन देण्यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आली असून, या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सोपी ठेवण्यात आली आहे. अर्जदार घरी बसून आपल्या मोबाइलच्या सहाय्याने या योजनेसाठी अर्ज करू शकतो. त्यामुळे अर्जदाराला कोणत्याच सरकारी कार्यालयाच्या फेरी मारण्याची आवश्यकता भासत नाही.

हेही वाचा:

The post स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) योजना : वर्षअखेर वैयक्तिक शौचालय बांधकाम उद्दिष्टपूर्ती appeared first on पुढारी.

Exit mobile version