Site icon

स्वतंत्र पोलिस ठाण्यासाठी नाशिक ते मुंबई काढणार अर्धनग्न मोर्चा, 6 ला होणार रवाना

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा

अंबड गाव, अंबड औद्योगिक वसाहत, चुंचाळे, दत्तनगर, घरकुल आदी परिसरातील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अंबड पोलिस ठाण्याचे विभाजन करून अंबड औद्योगिक वसाहतीत स्वतंत्र पोलिस ठाण्याची निर्मिती करावी या मागणीसाठी स्थानिक नागरिकांसह नाशिक ते मुंबई अर्धनग्न पायी मोर्चा काढण्यात येणार आहे. मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्वतंत्र पोलिस ठाण्याच्या मागणीचे निवेदन देणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते साहेबराव दातीर, माजी नगरसेवक राकेश दोदे, रामदास दातीर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पायी मोर्चा मंगळवार दि .६ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता एकसलो पॉईन्ट येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मुंबईकडे रवाना होणार आहे. अंबड औद्योगिक वसाहतीलगत चुंचाळे दत्तनगर, संजीवनगर, अंबड लिंकरोड परिसरात दिवसेंदिवस नागरी वस्तीचा विस्तार होत असून या भागात गुन्हेगारी कारवायाही मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. मागील आठवड्यात ७० वर्षीय वृद्धाचा खून करून लुटमार केल्याची घटना घडली आहे. तसेच या भागात परप्रांतीयाची संख्या वाढल्याने गुन्हेगारी वाढली आहे. तसेच गोळीबारा सारख्या घटना घडल्या आहेत.

या भागात हाणामाऱ्या-लुटमार, धमकी, मारहाणीसाखे प्रकार नित्याचेच झाले आहेत. येथून अंबड पोलीस ठाणे आठ ते दहा कि. मी अंतरावर असल्याने घटना घडल्यावर पोलिसांना माहिती दिली असता पोलिसांना पोहोचण्यास विलंब होतो. त्यामुळे गुन्हेरांवर कारवाई करण्यास विलंब होतो. तर अनेकदा पळून जाण्यात गुन्हेगार यशस्वी होत आहेत. याशिवाय अंबड पोलीस ठाण्याचे भौगोलिक क्षेत्रफळ मोठे असूनही त्याप्रमाणात कर्मचारी वर्ग उपलब्ध नसल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर मर्यादा येत आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर अंबड पोलीस ठाण्याचे विभाजन करूनल अंबड औद्योगिक वसाहतीसाठी स्वतंत्र पोलिस ठाण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे.

मात्र प्रशासकीय उदासीनतेमुळे आजतागायत पोलीस ठाण्याच्या निर्मितीचा प्रश्न अनुत्तरित राहिला आहे. पायी मोर्चाने मुंबईला जाऊन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना निवेदन देणार असल्याची माहिती साहेबराव दातीर, माजी नगरसेवक राकेश दोदे, रामदास दातीर यांनी दिली. अर्धनग्न पायी मोर्चा मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन साहेबराव दातीर, माजी नगरसेवक राकेश दोदे, रामदास दातीर, नितीन दातीर, महेश दातीर, शरद कर्डिले अरुण दातीर, त्र्यंबक मोरे, गोकुळ दातीर, शांताराम, फडोळ आदींनी केले आहे.

हेही वाचा :

The post स्वतंत्र पोलिस ठाण्यासाठी नाशिक ते मुंबई काढणार अर्धनग्न मोर्चा, 6 ला होणार रवाना appeared first on पुढारी.

Exit mobile version