स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मभूमीत बंद ; राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा निषेध

सावरकर जन्मभूमी बंद,www.pudhari.news

नाशिक (देवळाली कॅम्प) : पुढारी वृत्तसेवा
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याचे देशभरात पडसाद उमटत असून, स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जन्मभूमी असलेल्या नाशिकमधील भगूरमध्येही शुक्रवारी (दि.18) कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी भारतीय जनता पार्टी, बाळासाहेबांची शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने राहुल गांधी यांच्या पोस्टरला जोडे मारत निषेध व्यक्त केला.

स्वयंस्फूर्तीने संपूर्ण भगूर शहरात व्यापारी व नागरिकांतर्फे कडकडीत बंद पाळण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज चौकात राहुल गांधींच्या पोस्टरला जोडे मारून तीव— शब्दांत निषेध व्यक्त करण्यात आला. चौकातील शिवरायांच्या पुतळ्यास खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्यास भाजपाचे शहराध्यक्ष गिरीश पालवे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मारकातील पुतळ्याला पुरोहित, महंत व मान्यवरांच्या हस्ते दुग्धाभिषेक करण्यात आला.

यावेळी अनिकेतशास्त्री देशपांडे, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष तानाजी करंजकर, बाळासाहेबांची शिवसेना गटाचे जिल्हाध्यक्ष अनिल ढिकले, महानगरप्रमुख प्रवीण तिदमे, भाजपाचे जिल्हा नेते प्रताप गायकवाड, बाबूराव मोजाड, प्रसाद आडके, विक्रम सोनवणे, शेखर कस्तुरे, दिनकर पवार, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष दादासाहेब देशमुख, सुनील जोरे, शरद कदम, उत्तम आहेर, अशोक मोजाड, युनूस शेख आदींसह सावरकरप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कुंदन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश गिते यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.

हेही वाचा :

The post स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मभूमीत बंद ; राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा निषेध appeared first on पुढारी.