Site icon

स्वामी समर्थांच्या पादुकांचे सुरगाणा नगरीत स्वागत, सवाद्य रथातून मिरवणूक

नाशिक (सुरगाणा) : प्रतिनिधी

सुरगाणा नगरीत अक्कलकोट येथील श्री. स्वामी समर्थ महाराजांच्या मूळ पादुकांची रथातून सवाद्य मिरवणूक काढून भव्य दिव्य असे स्वागत करण्यात आले. यावेळी दस्तुरखुद्द स्वामींच्या मूळ पादुकांचे दर्शन मिळणार या भावनेतून प्रचंड संख्येने उपस्थित असलेल्या स्वामी भक्तांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहताना दिसून आला. दोन दिवसांचा हा सोहळा उत्साहात संपन्न झाला.

स्वामींच्या पादुकांचे आगमन सुरगाणा शहराच्या वेशीवर झाल्यानंतर तेथून येथील श्री. स्वामी समर्थ मठाचे मठाध्यक्ष माऊली नितिन महाले यांनी स्वामी यांच्या पादुका डोक्यावर घेऊन त्यांच्या निवासस्थाना पर्यंत आणले. निवासस्थानी विश्रांती व पादुका पूजन करून रथातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या या पाद्य पुजन सोहळ्यात शहरासह तालुका तसेच जिल्ह्यातून भक्तगण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मिरवणूक मार्गावर रांगोळी काढण्यात आली होती. यावेळी घरोघरी पादुकांचे औक्षण करण्यात येऊन भक्तांनी रथातील पादुकांचे दर्शन घेतले. मिरवणूकी दरम्यान युवकांनी सोहळे, डोक्यावर फेटा तर युवती व महिलांनी नऊवारी व डोक्यावर फेटा असा वेश परिधान केला होता. पादुकांची रथातून निघालेली मिरवणूक सर्वांचेच लक्ष वेधून घेत होती. यावेळी माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, समीर चव्हाण, हिरामण गावित यांनी देखील उपस्थित पादुकांचे दर्शन घेतले.

येथील मठात पादुकांचे आगमन झाल्यानंतर महाआरती व महाप्रसादाचा लाभ भाविकांनी घेतला. दुसऱ्या दिवशी १०१ यजमानांच्या हस्ते मंत्रांचाराच्या घोषात पाद्यपुजन व महाभिषेक करण्यात आला. जवळपास तीन ते चार तास हा सोहळा उत्साहात सुरू होता. अगदी जवळून स्वामींच्या मूळ पादुकांचे दर्शन झाल्याने प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.

श्री स्वामी समर्थांच्या सुरगाणा येथील मठाला बावीस वर्षे पूर्ण झाली आहेत. हे स्थान जागृत झाले असल्याची भावना भक्तांमध्ये आहे. मुळस्थान असलेल्या श्री. क्षेत्र अक्कलकोट येथील श्री. स्वामी समर्थ महाराजांच्या मुळ अक्कलकोट येथील श्री चोळप्पा महाराज यांना श्री स्वामी समर्थ महाराजांनी दिल्या होत्या. चोळप्पा महाराजांचे वंशज महेश जगन्नाथ पुजारी यांच्या हस्ते या मुळ पादुकांचे सुरगाणा नगरीतील श्री स्वामी समर्थ मठात आगमन झाले. त्या पार्श्वभूमीवर २७ व २८ असा दोन दिवसीय अभुतपुर्व सोहळा उत्साहात संपन्न झाला. यावेळी माऊली नितिन महाले यांनी स्वामी व चोळप्पा महाराज यांची प्रवचन पर कथा सांगितली.

यानंतर चोळप्पा महाराजांचे वंशज महेश गुरुजी, प्रसाद कुलकर्णी, संदिप सवई, संदिप देशपांडे, सोमकांत कुलकर्णी (राजपुरोहित) यांनी व या सोहळ्याला आवर्जून उपस्थित राहिलेले माजी आमदार जे.पी.गावित यांनी मनोगत व्यक्त केले. हा आनंदमयी सोहळा उत्साहात पार पडावा यासाठी मठाध्यक्ष माऊली नितिन महाले यांचेसह सेवेकरी विशाल शिरसाठ, प्रशांत मोरे, ओम जंगम, सचिन महाले अजय सोनवणे, ओम जंगम, निलेश थोरात, तुषार मोरे आदींसह प्रचंड संख्येने स्वामी भक्त उपस्थित होते.

श्री. स्वामी समर्थांच्या मठातील हा भव्य सोहळा आणि उपस्थित लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच चांगल्या संस्कृतीचे मार्गदर्शन करणारा असा आहे. या मठाच्या माध्यमातून चांगले संस्कार होतील.
जे.पी.गावित
माजी आमदार.

 

स्वामींच्या पादुकांचे आगमन झाल्यापासून ते दुसऱ्या दिवशी देखील लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत असे सर्वच या सोहळ्याला उपस्थित राहिले. पाद्य पुजन सोहळ्यात तुम्हा सर्वांचा उत्साह दिसून आला. कुठे उदाहरण द्यायचे झाल्यास सुरगाणा मठाचे व येथील भक्तांचे उदाहरण देऊ.
श्री महेश गुरुजी
चोळप्पा महाराजांच्या सातव्या पिढीतील वंशज.

हेही वाचा :

The post स्वामी समर्थांच्या पादुकांचे सुरगाणा नगरीत स्वागत, सवाद्य रथातून मिरवणूक appeared first on पुढारी.

Exit mobile version