हागणदारीमुक्त मोहिम : उद्घाटनाच्या प्रतीक्षेतील शौचालयामुळे रहिवाशांच्या हाती टमरेल

सातपूर www.pudhari.news

नाशिक (सातपूर) : पुढारी वृत्तसेवा

प्रबुद्धनगर झोपडपट्टीमध्ये कष्टकरी नागरिकांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेले सार्वजनिक शौचालय हे एक वर्षापासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे एकूण १० हजार लोकसंख्या असलेल्या वसाहतींमध्ये सार्वजनिक शौचालयाची कमतरता असल्याने महिलांची कुचंबना होत असून, रहिवाशांना उघड्यावर टमरेल घेऊन प्रातर्विधी उरकावा लागत आहे.

हगणदारीमुक्त परिसर करण्यासाठी शासनस्तरापासून तर गावपातळीपर्यंत प्रयत्न केले जात असताना केवळ उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या शौचालय सुरू होत नसल्याने प्रबुद्धनगर परिसराला बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे. जागेअभावी घरोघरी खासगी शौचालये उभारणे शक्य नसल्याने नागरिकांना सार्वजनिक शौचालयाची आवश्यकता आहे. गेल्या चार वर्षांपासून येथील रहिवासी शौचालयाची मागणी करत होते. त्यांच्या मागणीचा विचार करून सार्वजनिक शौचालय बांधकाम पूर्ण झाले. परंतु, तब्बल एक वर्ष उलटूनदेखील अद्याप सार्वजनिक शौचालय सुरूच झाले नसल्याने परिसरातील महिलांची कुचंबना होत आहे. केंद्र सरकारच्या व नाशिक महानगरपालिकेच्या हगणदारीमुक्त शहर या उद्देशाला मनपा प्रशासनाकडूनच केराची टोपली दाखवली जात आहे. परिणामी नागरिकांची विशेषत: आबालवृद्धांची गैरसोय होत आहे. त्यात नित्याने पावसाळा सुरूच असल्याने त्वरित शौचालय सुरू करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते बजरंग शिंदे यांनी वारंवार विभागीय अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली. तरीही हेतूपुरस्सर दुर्लक्ष होत असल्याचा आरोप रहिवासी करत आहेत. प्रबुद्धनगर झोपडपट्टी कष्टकरी, मजूर कामगारांची लोकवस्ती आहे. येथील नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी संत रोहिदास चौक येथे सार्वजनिक शौचालय बांधण्यात आले. मात्र एक वर्षापासून ते कुलूपबंद आहे. नागरिकांसाठी खुले करण्याची मागणी माजी नगरसेविका ज्योती शिंदे, देवीदास अहिरे, संतोष जाधव, अशोक व्हावळे, दिनेश गोटे, विक्रम शिंदे, आप्पा आव्हाड, ज्ञानेश्वर बटावे, कैलाश सोनवणे आदींनी केली आहे.

हेही वाचा:

The post हागणदारीमुक्त मोहिम : उद्घाटनाच्या प्रतीक्षेतील शौचालयामुळे रहिवाशांच्या हाती टमरेल appeared first on पुढारी.