हिंमत असेल तर संजय राऊतांनी… गुलाबराव पाटलांचे थेट आव्हान

संजय राऊत, गुलाबराव पाटील, www.pudhari.news

जळगाव : आमचा उद्धव साहेबांवर राग नाही. मात्र ज्या संजय राऊतांनी शिवसेना संपवली त्यांना आमचा विरोध आहे. संजय राऊतांकडे हिंमत असेल तर त्यांनी जळगाव ग्रामीणमधून निवडणूक लढवून दाखवावी, असे आव्हान पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहे.

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे रविवारी ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांची जाहीर सभा झाली. या सभेला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी विरोध केला होता. सभेत माझ्याविषयी काही बोलल्यास थेट सभेत घुसण्याची धमकी दिली होती. मात्र कुठल्याही अडथळ्या विना ही सभा पार पडली. या सभेनंतर मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले की, उद्धव साहेबांच्या बाबतीत आमचा राग नाही. त्यांच्या काही म्हणण्याने आमच्या प्रतिमेवर परिणाम होणार नाही. पण, ज्या माणसाने शिवसेना फोडली त्याच्यावर आमचा राग आहे. काल पाचोऱ्यातील सभेत संजय राऊत फक्त 3 मिनिट बोलले. ते फक्त गुलाबो गॅंग बोलले आणि खाली बसले. संजय राऊतांकडे कोणतही व्हिजन नाही. सभेत संजय राऊत यांच्या कानात कोणीतरी सांगितले असेल की शांत रहा. त्यामुळेच केवळ तीन मिनिटे बोलून संजय राऊत यांनी भाषण संपवले.
———
आधी संजय राऊतांनी राजीनामा द्यावा…

गुलाबराव पाटील म्हणाले, आमच्या मतांच्या जोरावरच संजय राऊत खासदार झाले आहेत. आमचे राजीनामा मागण्याचा संजय राऊतांना काय अधिकार आहे. आधी त्यांनी राजीनामा द्यावा, संजय राऊत यांची लायकी काय आहे. जळगावमध्ये आमचीच शिवसेना असल्याचे ते म्हणत आहेत. राज्यात दीड वर्षांनी आमदारकीच्या निवडणुका होतील. हिंमत असेल तर खासदार संजय राऊत यांनी जळगाव ग्रामीणमधून निवडणूक लढवून दाखवावी. संजय राऊत मर्द, नामर्द अशी भाषा करत आहेत. त्यांना या निवडणुकीत चारी मुंड्या चीत करून दाखवेल, अशी टीका गुलाबराव पाटील यांनी केली.

The post हिंमत असेल तर संजय राऊतांनी... गुलाबराव पाटलांचे थेट आव्हान appeared first on पुढारी.