२५ देशांत सांगली, सोलापूर, नाशिकचा बेदाणा; २०० कोटींची उलाढाल

Raisin Export

नाशिक; सतीश डोंगरे : जागतिक बाजारपेठेत नाशिकसह सांगली, सोलापूरच्या बेदाण्याला मोठी मागणी असून, हिवाळ्यात या मागणीत मोठी भर पडताना दिसत आहे. नाशिक, सांगलीचा बेदाणा जगातील 25 देशांमध्ये निर्यात केला जात आहे. गेल्यावर्षी सुमारे 18 हजार मेट्रिक टन इतका बेदाणा वर्षभरात निर्यात करण्यात आला आहे. त्यापैकी निम्मा म्हणजेच नऊ हजार मेट्रिक टन बेदाणा केवळ हिवाळ्यात निर्यात करण्यात आला असून, यातून सुमारे दोनशे कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. यंदाही बेदाणा निर्यात जोरात सुरू आहे. (Raisin Export)

नाशिक आणि सांगली, सोलापूरमध्ये मोठ्या प्रमाणात बेदाणा तयार केला जातो. या बेदाण्याला भारतासह इतर देशांमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी आहे. विशेषत:, आखाती देश आणि युरोपमध्ये हा बेदाणा मोठ्या प्रमाणात निर्यात केला जातो. द्राक्ष उत्पादनासाठी ओळखल्या जात असलेल्या नाशिक जिल्ह्यात साधारणत: 10 वर्षांपूर्वी बेदाण्याचे अवघे दोन ते तीन हजार टन उत्पादन घेतले जात होते. अशीच काहीशी स्थिती सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांतही होती. मात्र, दर्जेदार उत्पादनाची हातोटी शेतकर्‍यांना कळाल्याने अन् आधुनिक तंत्रज्ञान सोबतीला असल्याने एकट्या नाशिक जिल्ह्यात वर्षाकाठी 45 हजार टनांहून अधिक बेदाण्याची निर्मिती केली जात आहे. हा बेदाणा देश-विदेशात निर्यात केला जात असून, त्यास दिवसेंदिवस मागणी वाढत आहे. (Raisin Export)

दरम्यान, वर्षभरात युरोप, युक्रेन, मलेशिया, सिंगापूर, सौदी अरेबिया, श्रीलंका यासह इतर देशांमध्ये बेदाण्याची निर्यात करण्यात आली आहे. कोरोना काळात बेदाणा उत्पादकांची मोठी कोंडी झाली होती. मात्र, आता जगभरात कोरोनामुळे असलेले निर्बंध उठविण्यात आल्याने, पुन्हा नाशिक, सांगलीचा बेदाणा सातासमुद्रापार पोहोचविला जात आहे. (Raisin Export)

युक्रेन, श्रीलंकेतील निर्यातीवर परिणाम (Raisin Export)

नाशिक, सांगलीचा बेदाणा ज्या टॉप फाईव्ह देशांत निर्यात केला जातो, त्यामध्ये युक्रेन आणि श्रीलंका या देशांचा समावेश आहे. मात्र, सध्या हे दोन्ही देश संकटात असल्याने, बेदाणा निर्यातीवर परिणाम झाला आहे. नाशिक, सांगलीचा बेदाणा इतर देशांच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात श्रीलंकेला निर्यात केला जातो. हीच स्थिती युक्रेनबाबतही आहे.

पिवळ्या बेदाण्याला मागणी

पिवळ्या बेदाण्याचा उत्पादक अशी ओळख असलेल्या नाशिकच्या या बेदाण्याला जगभरात मोठी मागणी आहे. कोरोनाच्या अगोदर म्हणजेच 2019 मध्ये नाशिक जिल्ह्यात पिवळ्या बेदाण्याचे दीड लाख टन उत्पादन घेण्यात आले होते. त्यापैकी 40 हजार टन बेदाण्याची निर्यात करत एक कोटी डॉलरचे परकीय चलन मिळविले होते. आता कोरोना निर्बंध हटल्याने, पुन्हा एकदा पिवळ्या बेदाण्याची मागणी वाढत आहे.

निर्यातीचे टॉप फाईव्ह देश

  • श्रीलंका : 2,500 मे. टन
  • सौदी अरब : 2,300 मे. टन
  • व्हिएतनाम : 2,000 मे. टन
  • युक्रेन : 2,000 मे. टन
  • नेपाळ : 1,000 मे. टन

अधिक वाचा :

The post २५ देशांत सांगली, सोलापूर, नाशिकचा बेदाणा; २०० कोटींची उलाढाल appeared first on पुढारी.