1200 रुपयांचे रेमडेसिव्हिर डॉक्टरने विकले 25 हजारांना! नाशिकमधील धक्कादायक घटना

म्हसरूळ (नाशिक) : कोरोना संसर्गाच्या लाटेचा फायदा घेणाऱ्या खासगी रुग्णालयांकडून होणाऱ्या अव्वाच्या सव्वा बिलांचे किस्से बाहेर येत असताना ज्या इंजेक्शनचा राज्यभर तुटवडा सुरू आहे, ते बाराशे रुपये किमतीचे इंजेक्शन तब्बल २५ हजार रुपयांना विकणाऱ्या डॉक्टरला आप्तस्वकीयांची सतर्कता व पोलिस वेळेवर पोचल्याने रविवारी (ता. ११) रात्री रंगेहाथ पकडण्यात आले. रात्री उशिरापर्यंत पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. काय घडले नेमके?

बाराशे रुपयाचे रेमडेसिव्हिर २५ हजारांना देण्याचे ठरले
देवळाली कॅम्प व शहरातील रुग्णालयात दाखल रुग्णासाठी तीन रेमडेसिव्हिर इंजेक्शनसाठी फिरफिर करणारे सामाजिक कार्यकर्ते योगेश मोहिते यांना एक क्रमांक मिळाला. त्यांनी संबंधित क्रमांकावर कॉल केला. तो कट करण्यात आला. काही वेळातच संबंधितांनी कॉल केला. यात बाराशे रुपये किमतीचे रेमडेसिव्हिर प्रतिइंजेक्शन २५ हजार रुपयांना देण्याचे ठरले. संबंधित इंजेक्श‍न देण्यासाठी अमृतधाम परिसरात रात्र आठ ते साडेआठच्या दरम्यान आले. मात्र मोहिते यांच्याकडे अवघे १६ हजार रुपये असल्याचे सांगितले. त्यांनी संबंधितांना अमृतधाम परिसरातील ॲक्सिस बँकेच्या एटीएमवर बोलविले. या वेळी सद्‌गरू हॉस्पिटलचे डॉ. राजेंद्र मुळूक त्या ठिकाणी आले. डॉ. मुळूक येण्याअगोदर मोहिते यांनी पोलिसांना घटना कळविली.

हेही वाचा - ह्रदयद्रावक; वडिलांसह दोन्ही लेकांची अंत्ययात्रा, एकाच वेळी ३ कर्त्या पुरुषांच्या जाण्याने कुटुंबावर शोककळा

डॉक्टर पोलिसांच्या ताब्यात; पंचवटी पोलिसांत गुन्हा दाखल 

दरम्यान, एटीएमवर डॉ. मुळूक आले असता मोहिते यांच्यासमवेत असलेल्या मित्राने ते आलेल्या वाहनाचे मोबाईलमध्ये छायाचित्र घेतले. ही बाब डॉ. मुळूक यांच्या लक्षात येताच त्यांनी पैसे तिथेच टाकून वाहनात बसून निघाले. दरम्यान, पोलिस गाडीही त्याच वेळी आली, त्यांनी वाहनाचा पाठलाग करीत डॉ. मुळूक यांना अडविले. त्यांच्या वाहनाची तपासणी केली असता त्यांना इंजेक्श‍न‍ मिळून आले. डॉ. मुळूक व तक्रारदारांना पोलिसांनी पंचवटी पोलिस ठाण्यात आणले. रात्री बारापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान, सद्‌गुरू हॉस्पिटलचे डॉ. रवींद्र मुळूक व त्यांचे सहकारी संचालक डॉ. भाबड यांनी डॉ. मुळूक संचालक असून, आज मात्र त्यांची सुटी असल्याबाबत सांगितले.  

हेही वाचा - लग्नाच्या तयारीला लागलेल्या वधू-वरांचा हिरमोड! विसंगत आदेशामुळे 'वेडिंग इंडस्ट्री'त गोंधळ