‘भारत बंद’मध्ये कांदा उत्पादक शेतकरी सहभागी होणार; दिघोळे यांची माहिती

सिन्नर  (नाशिक) : दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी मंगळवारी (दि.8) डिसेंबर रोजी पुकारण्यात आलेल्या भारत बंदमध्ये राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी देखील सहभागी होणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

सन 2022 पर्यंत देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू अशी घोषणाबाजी करणारे केंद्रातील विद्यमान सरकार सातत्याने शेतकरी हिताच्या विरोधात निर्णय घेत आहे. सुधारित शेतकरी कायदे किंवा शेतमालाच्या आयात निर्यातीचे धोरण, या सर्वच बाबतीत सरकारने शेतकरी विरोधी भूमिका घेतल्याचे दिसत आहे.

हेही वाचा>> उच्चशिक्षित दिव्यांग रामेश्वरचा संघर्ष! रेल्वे बंदमुळे फरफट; प्रशासकीय सेवेत अधिकारी बनायचे स्वप्न 

कांदा उत्पादकांमध्ये संताप

देशात सर्वाधिक कांदा पिकवणाऱ्या महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांनाही केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी निर्णयामुळे वारंवार आर्थिक फटका बसला आहे. कांद्याचे बाजार भाव वाढल्याचे निमित्त करून व ग्राहक हित जपण्याचे कारण देत या सरकारने कांद्याची निर्यात बंदी केली. आज कांद्याचे दर अगदी उत्पादन खर्चापेक्षाही कमी म्हणजे 2 हजार रुपये प्रतिक्विंटल यापेक्षाही कमी झाल्याने महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांमध्ये संतापाची लाट असल्याचे दिघोळे यांनी म्हटले आहे. कांद्याला जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून वगळल्यानंतरही जर केंद्र सरकार कांद्यावर विविध प्रकारचे निर्बंध घालत असेल तर नुकत्याच मंजुरी केलेल्या तीनही कृषी कायद्यांमुळे भविष्यात शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही याची शाश्वती काय आहे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. 
केंद्राच्या सुधारित कृषी धोरणास विरोध करण्यासाठी राजधानी दिल्लीमध्ये गेल्या 11 दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (दि.8) डिसेंबरला संपूर्ण देशात बंदची हाक देण्यात आली आहे. राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी देखील संघटनेच्या माध्यमातून या बंदमध्ये सहभागी होणार असल्याची माहिती दिघोळे यांनी दिली.

हेही वाचा >> एकुलत्या एक लेकाची जेव्हा निघाली अंत्ययात्रा; मटाणे गावावर शोककळा

देशातील शेतकरी त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात सरकारविरोधात एकवटला आहे. आता तरी सरकारने शेतकरी हिताचे निर्णय घ्यावेत व जगात देशाची कृषिप्रधान अशी असलेली ओळख कायम टिकवावी.
- भारत दिघोळे, अध्यक्ष महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटना