लासलगाव, पिंपळगावमध्ये ‘असा’ उन्हाळ कांद्याचा भाव; पुढील आठवड्यात भाव स्थिरावण्याची शक्यता

नाशिक/लासलगाव : दिवाळीच्या सुटीनंतर बाजारात उन्हाळ कांद्याची आवक वाढल्याने भावाची स्थिती काय राहणार याबद्दलची उत्सुकता होती. प्रत्यक्षात गुरुवारी (ता. १९) लासलगाव आणि पिंपळगावमध्ये उन्हाळ कांदा क्विटंलला सरासरी चार हजार २०० रुपये भावाने विकला गेला. पुढील आठवड्यात भाव स्थिरावण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

लासलगाव, पिंपळगावमध्ये उन्हाळ कांद्याचा भाव
शेतकऱ्यांनी साठविलेल्या उन्हाळ कांद्याचे प्रमाण कमी झालेले आहे. अशातच, देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे कांदा भाव खाणार हे जवळपास स्पष्ट झालेले आहे. गुरुवारी येवल्यात साडेतीन हजार, तर मनमाडमध्ये तीन हजार ८०० रुपये क्विंटल असा उन्हाळ कांद्याचा सरासरी भाव निघाला. उन्हाळ कांद्याच्या जोडीला नवीन पोळ लाल कांदा विक्रीसाठी येत आहे. त्यास उन्हाळ कांद्याप्रमाणे भाव मिळू लागला आहे.

हेही वाचा > मामाने वाचवले पण नियतीने हिरावले! चिमुकल्या जयाची मृत्युशी झुंज अपयशी

पुढील आठवड्यात भाव स्थिरावण्याची शक्यता 

गुरुवारी पिंपळगावमध्ये चार हजार १००, तर मनमाडमध्ये चार हजार रुपये क्विंटल असा सरासरी भाव लाल कांद्याला मिळाला. दिवाळीच्या अगोदर आयात कांदा बाजारात दाखल झाला असताना उन्हाळ कांद्याप्रमाणे लाल कांद्याच्या भावात मोठी घसरण झाली होती. मात्र दिवाळीच्या सुट्या सुरू होण्याअगोदर या दोन्ही कांद्याच्या भावात सुधारणा झाली होती. 

हेही वाचा > मोकाट कुत्र्याच्या तावडीत इवलेसे बिथरलेले पाडस; युवकांनी दिले जीवदान