“दाभाडीत आज पाण्याची गंगा; या पुढे विकास गंगा वाहील” – कृषीमंत्री दादा भुसे

मालेगाव (नाशिक) : राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेच्या माध्यमातून तळवाडे धरणाच्या पाणी पुरवठा योजनेतून दाभाडी गावात आज पाण्याची गंगा आली आहे, येथून पुढे विकासाची गंगा वाहील, असे प्रतिपादन कृषिमंत्री दादा भुसे यांनी शनिवारी (ता. 28) केले. दाभाडी (ता. मालेगाव) येथे तळवाडे धरणाच्या पाणीपुरवठा योजनेचे लोकार्पण व विविध विकास कामांच्या उद्‌घाटनप्रसंगी मंत्री भुसे बोलत होते.

महिला शेतकऱ्यांनाही सक्षमीकरणासाठी शासन प्रयत्नशिल

आघाडी शासनाच्या वर्षपूर्तीनिमीत्त विविध विकास कामांची सुरुवात करताना मनस्वी आनंद होत असल्याचे सांगत भुसे म्हणाले, की 12 गांव पाणी पुरवठा योजनेचे लोकार्पण करतांना विशेषत: महिलांच्या चेहऱ्यावरील आनंद हीच माझी वचनपूर्ती झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. सर्व कामे दर्जेदार पध्दतीने झाली पाहिजे असे निर्देशही त्यांनी यावेळी संबंधितांना दिले. पुढील वर्षभरात गावातील विकास कामांमुळे गावाचा नक्कीच विकास होईल असा विश्वासही व्यक्त केला. गावातील अतिक्रमीतांची घरे नियमनाकूल करण्याचे आवाहन करत गट शेतीच्या माध्यमातून शेतमालासाठी गोडावून व कोल्ड स्टोरेजच्या निर्मीतीसाठी मोठा निधी उभारण्याचे आश्वासन दिले. अवकाळी व सततच्या पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी भरीव निधी उभा करून बळीराजाच्या पुर्नवसनासाठी शासनाने चांगली मदत केली आहे. शिवभोजन, आदिवासी बांधवांसाठी खावटी कर्ज माफीचा निर्णयासह राज्यातील शेतकऱ्याला विविध कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी एक पानी अर्जाची सोय करून शेतकऱ्यांना सन्मानाची वागणूक मिळण्यासाठी शासन प्रयत्नशिल आहे. विकेल ते पिकेल योजनेच्या अनुषंगाने शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासह महिला शेतकऱ्यांनाही सक्षम करण्यासाठी शासन प्रयत्नशिल असल्याचे कृषी मंत्री भुसे यावेळी म्हणाले.

हेही वाचा > दुर्देवी! वडिलांनाच पाहावा लागला पोटच्या मुलाच्या मृत्यूचा थरार; पायाखालची जमीनच सरकली

यावेळी प्रभारी सरपंच सुभाष नहिरे, जिल्हा परिषद सदस्या संगिता निकम, पंचायत समिती सदस्या कमळाबाई मोरे, बाजार समितीचे सभापती राजेंद्र जाधव, मनोहर बच्छाव, संजय दुसाणे, प्रमोद निकम, शशिकांत निकम, डॉ. एस. के. पाटील, निळकंठ निकम यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

यावेळी डॉ. एस. के. पाटील यांनी आदर्शग्राम पंचायतीसाठी प्रयत्नशील असल्याचे सांगून मनोगत व्यक्त केले. निळकंठ निकम, प्रमोद निकम यांनी मनोगत व्यक्त केले. दाभाडी रोकडोबानगर स्मशान भुमी शेड, बैठक व्यवस्था, गावांतंर्गत रस्ता व डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथील समाज मंदीर शेडचे भुमीपूजन करण्यात आले. अमोल निकम यांनी सुत्रसंचलन केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य भावना निकम, सोनाली निकम, आशाबाई निकम, सुरेखा मानकर, विद्या निकम, आक्काबाई सोनवणे, संगीता गायकवाड, शरद देवरे, अविनाश निकम, विशाल निकम, दादाजी सुपारे, अंताजी सोनवणे, भिकन निकम, अमृत निकम, संजय निकम आदि उपस्थित होते. 

हेही वाचा > आडगावला व्यापाऱ्याला पाच लाखांचा गंडा! ११० क्विंटल लोखंडाच्या मालाचा अपहार